05 July 2020

News Flash

राज्यसभेची १ जागा जिंकण्यासाठी भाजप कुठल्याही थराला जाऊ शकतो: काँग्रेस

'हा तर भाजपचा कट'

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल. (संग्रहित छायाचित्र)

गुजरात काँग्रेसचे आमदार वास्तव्यास असलेल्या कर्नाटकातील इगलटोन रिसॉर्टवर आयकर विभागानं छापेमारी केल्यानंतर काँग्रेसनं भाजपवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. राज्यसभेच्या गुजरातमधील एका जागेवर विजय मिळवण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकतो, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी केली आहे. तर भाजपनं सूडभावनेतून काँग्रेसच्या नेत्याच्या रिसॉर्टवर छापेमारी केली आहे, असा आरोपही काँग्रेसनं केला आहे.

 

गुजरातमधील राज्यसभेच्या जागांसाठी ८ ऑगस्टला मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला फुटीचं ग्रहण लागलं आहे. काँग्रेसच्या सहा आमदारांनी राजीनामे दिल्यानंतर फुटीच्या भीतीनं काँग्रेसनं त्यांचे ४० हून अधिक आमदारांना बंगळुरूत नेलं. रातोरात त्यांना विमानानं कर्नाटकात नेण्यात आलं. या आमदारांना कर्नाटकातील मंत्री आणि काँग्रेस नेते शिवकुमार यांच्या रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलं होतं. याच रिसॉर्टवर आयकर विभागानं आज छापेमारी केली. या छापेमारीनंतर काँग्रेसनं भाजपवर कडाडून टीका केली आहे. राज्यसभेची एक जागा जिंकण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकतो, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी केली आहे. राज्याची यंत्रणा आणि इतर एजन्सींचा वापर केल्याचं या छापेमारीतून स्पष्ट झालं असून भाजपची निराशा यातून दिसून येते, अशी टीका पटेल यांनी केली आहे. राज्यसभेची जागा जिंकण्यासाठी भाजपकडून हरतऱ्हेने प्रयत्न करण्यात येत आहेत. काँग्रेस नेत्याच्या रिसॉर्टवरील छापेमारी हा भाजपचा कुटील डाव असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. दरम्यान, शिवकुमार यांच्या रिसॉर्टवरील छापेमारीचा मुद्दा काँग्रेसनं लोकसभा आणि राज्यसभेतही लावून धरला. रिसॉर्टवरील छापा हा भाजपचा कट असल्याचं काँग्रेसच्या सदस्यांनी म्हटलं. तर काँग्रेसच्या आमदारांना घाबरवण्याचा भाजपकडून प्रयत्न करण्यात येत आहे, असा आरोप गुलाम नबी आझाद यांनी केला आहे. यानंतर काँग्रेसच्या सदस्यांनी राज्यसभेत भाजपविरोधात घोषणाबाजी केली. या गदारोळामुळं राज्यसभेचं कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2017 11:42 am

Web Title: congress leader ahmed patel alleged bjp after income tax raids in egletone resort
Next Stories
1 पुतिन यांचा ‘विनोद मित्र’ २०१९ च्या निवडणुकीत देणार मोदींना आव्हान!
2 अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड घेणार ‘लष्कर’च्या दुजानाची जागा
3 गुजरात काँग्रेसच्या आमदारांना लपवून ठेवणाऱ्या कर्नाटकातील रिसॉर्टवर छापा
Just Now!
X