स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला सबोधित केलं. यावेळी त्यांनी पाकिस्तान आणि चीनचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. “एलएसीपासून एलओसीपर्यंत ज्याने कोणी भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हानं दिलं, त्यांना आपण चोख प्रत्युत्तर दिलं,” असं मोदी म्हणाले होते. पंतप्रधानांच्या या वक्तव्यावरून काँग्रेसनं त्यांच्यावर निशाणा साधला. “केवळ बोलणंच पुरेसं नाही,” असं काँग्रेसनं म्हटलं.

“केवळ बोलणंच पुरेसं नाही. जर त्यांनी उत्तर दिलं तर आम्हाला आनंदच होईल. परंतु पण पंतप्रधान आणि त्यांचे सरकार यांना वास्तवाची माहिती आहे. वास्तव चांगलं नाही. जर त्यांनी (चिनी सैनिक) आपल्या क्षेत्रात प्रवेश केला तर संरक्षण मंत्री काही वेगळं बोलतात आणि पंतप्रधान काही वेगळं बोलतात,” अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी एएनआयशी बोलताना दिली.

आणखी वाचा- सरकार चीनचं नाव घ्यायला का घाबरतंय?; कॉंग्रेसचा सवाल

आणखी वाचा- ‘आमचे जवान काय करु शकतात, ते संपूर्ण जगाने लडाखमध्ये पाहिले’

काय म्हणाले होते मोदी?

“LoC पासून LAC पर्यंत, ज्यांनी कोणी भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले, त्यांना त्याच भाषेत प्रत्युत्तर मिळाले. भारताच्या संप्रभुतेच्या रक्षणासाठी संपूर्ण देशामध्ये जोश भरलेला आहे” असं मोदी म्हणाले होते. दहशतवाद असो किंवा विस्तारवाद भारत ठामपणे त्याचा मुकाबला करत आहे असे मोदी म्हणाले. त्यांनी नाव न घेता चीन-पाकिस्तान दोघांना टोला लगावला. शांतता आणि सौहार्दासाठी भारताचे जितके प्रयत्न आहेत, तितकाच भारत मातृभूमीच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत १८४ देशांनी यूएनमधील आपल्या दाव्याचे समर्थन केले याकडे मोदींनी लक्ष वेधले. देश मजबूत आणि आत्मनिर्भर असेल तेव्हाच हे शक्य होत असल्याचंही मोदी म्हणाले.