23 January 2021

News Flash

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं करोनामुळे निधन

काँग्रेसवर शोककळा : "ते एखाद्या मौल्यवान संपत्तीसारखे होते"

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल. (संग्रहित छायाचित्र)

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचं बुधवारी पहाटे निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. एका महिन्यापूर्वी अहमद पटेल यांना करोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. पटेल यांच्या जाण्यानं काँग्रेसवर शोककळा पसरली आहे.

अहमद पटेल यांचे पुत्र फैजल पटेल यांनी ट्विट करून माहिती दिली. “जड अंतःकरणाने माझे वडील अहमद पटेल यांचं निधन झाल्याची घोषणा करावी लागत आहे. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ३.३० वाजता आपल्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला. जवळपास एका महिन्यापूर्वी त्यांना करोना झाल्याचं निदान झालं होतं. उपचारादरम्यान त्यांच्या शरीराच्या अनेक अवयवांनी काम करणं बंद केलं होतं. एकाच वेळी अनेक अवयव निकामी झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर गुरूग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो. मी सगळ्यांना आवाहन करतो की, गर्दी ठिकाणी जाणं टाळून करोना नियमांचं पालन करा. नेहमी सोशल डिस्टन्सिगचं पालन करा,” असं फैजल पटेल यांनी म्हटलं आहे. अहमद पटेल यांनी १ ऑक्टोबरला स्वतः ट्विट करून करोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती.

अहमद पटेल यांच्या निधनाचं वृत्त कळताच काँग्रेसवर शोककळा पसरली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी अहमद पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. “अहमद पटेल पक्षाचा एक स्तंभ होते. ते संपूर्ण आयुष्य काँग्रेसमध्ये जगले. जेव्हा काँग्रेस पक्ष खडतर काळातून जात होता, तेव्हाही ते पक्षासोबत उभे राहिले. ते एखाद्या मौल्यवान संपत्तीसारखे होते. आम्हाला सदैव त्यांची उणीव जाणवत राहिल. या दुःखाच्या प्रसंगी फैजल, मुमताज आणि संपूर्ण कुटुंबासोबत माझ्या सहवेदना आहेत,” असं राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटलं आहे.

राहुल गांधी यांच्याबरोबरच काँग्रेसच्या नेत्यांनी अहमद पटेल यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अहमद पटेल तीन वेळा लोकसभेचे सदस्य राहिले होते. त्याचबरोबर पाच वेळा राज्यसभेचे खासदार होते. ऑगस्ट २०१८ मध्ये त्यांच्यावर पक्षाचे कोषाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. १९७७ मध्ये अवघ्या २६ वर्षी ते भरूच लोकसभा मतदारसंघातून संसदेत पोहोचले होते. कायम पडद्यामागे राहून काम करणाऱ्या अहमद पटेल यांचं पक्षामध्ये मोठं वजन होते. गांधी कुटुंबांच्या विश्वासातील नेत्यांमध्ये त्यांचं नावं घेतलं जायचं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 25, 2020 7:24 am

Web Title: congress leader ahmed patel passes away after battling with covid 19 bmh 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 ‘स्पुटनिक ५’ लस ९५ टक्के प्रभावी
2 देशात करोना चाचणीच्या समान दरासाठी याचिका, केंद्राला नोटीस
3 देशात दैनंदिन करोना संसर्ग दर ४ टक्क्यांपेक्षा कमी
Just Now!
X