देशाचा जीडीपी दर उणे २४ वर गेल्यानंतर विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. “स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदा जीडीपी घसरला आहे. एकीकडे सर्वात अपयशी अर्थमंत्री असे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. अशा गंभीर विषयांवर काही प्रसारमाध्यमं जाणीवपूर्वक गप्प आहेत. अर्थव्यवस्था सावरण्याची जबाबदारी अर्थमंत्र्यांची असून त्या या परीक्षेत नापास झाल्याचे सिद्ध झालं आहे,” असं म्हणत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते आमदार अनंत गाडगीळ यांनी टोला लगावला. संघाच्या वर्गात वाढलेल्यांनी या परीक्षांची तरी ‘नीट’ तयारी करावी असंही ते म्हणाले.

जीडीपी घसरणीत उच्चांक, कोरोनाबाधित रुग्णसंख्येत उच्चांक, थोडक्यात अर्थ, आरोग्य, संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, गृह अशा सर्व आघाड्यांवर अपयशी ठरणारे केंद्रातील भाजपा सरकार म्हणजे ‘नापास’ विद्यार्थ्यांचा ‘वर्ग’ झाला आहे. संघाच्या ‘वर्गात’ वाढलेल्यांनी निदान या परिक्षांची तरी ‘नीट’ तयारी करावी, असं म्हणत गाडगीळ यांनी भाजपाचा समाचार घेतला.

भाजप सरकारचा समाचार घेताना गाडगीळ पुढे म्हणाले, भारताचा आत्तापर्यंत मित्र राहिलेले उत्तरेकडील नेपाळ राष्ट्र हळूहळू चीनकडे सरकत आहे, पूर्वेकडे भुतान व बांगलादेशाला चीन चुचकारु लागला आहे, दक्षिणेकडे श्रीलंकेत चिनी नौदलाचा तळ उभारला जात आहे, पश्चिमेकडे इराणने अब्जावधी रुपयांच्या रेल्वेमार्गाचे काम भारताकडून काढून घेत चीनला दिले. यावरून मित्र राष्ट्रांसोबत योग्य धोरण राबविण्यात परराष्ट्रमंत्री अयशस्वी ठरल्याचे स्पष्ट होत असल्याचंही गाडगीळ यांनी नमूद केलं. हेरगिरी करताना अमेरिकेत पकडलेल्या अॅलन हो या चिनी हेराला ज्या ‘बँक ऑफ चायना’ मधील एका गुप्त खात्यातून पैसे पूरविल्याचा अहवाल एफबीआयने दिला. त्याच बँकेला मुंबईतील बीकेसीमध्ये कार्यालय उघडण्यास परवानगी देणे यात केंद्रीय गृह खात्याचा  बेजबाबदारपणा दिसून येत असल्याचं त्यांनी सांगितलं.

निवडणूक मेळाव्यासाठी भारतातील विमानतळं सुरू

“सिंगापूर, न्यूझीलंड, व्हिएतनामपासून दुबईपर्यंत अनेक राष्ट्रांनी जानेवारीतच आपले विमानतळ बंद केले असताना ट्रम्प यांच्या गुजरातमधील निवडणूक मेळाव्यासाठी  मार्चअखेर पर्यंत भारताने विमानतळ उघडे ठेवले. १  जानेवारी ते १५ मार्च या काळात १० लाख प्रवासी मुंबई विमानतळावर उतरले असता केवळ १९ टक्के प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. तिसुद्धा  पूर्वेकडून आलेल्यांची करण्यात आली. आता तर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसाला ८० हजारांवर पोहोचली आहे. राज्यांशी योग्य समन्वय न साधल्याचे हे दुष्परिणाम आहेत. हवाई वाहतूकमंत्री व आरोग्यमंत्री दोघेही निष्भ्रम ठरले आहेत,” असंही ते म्हणाले.