काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्ते आणि नेत्यांना भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून शिकण्याचा सल्ला दिला आहे. रविवारी काँग्रेस कार्यकारिणीच्या (सीडब्ल्यूसी) बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी रणनिती बनवण्यावर जोर दिला.

सर्व विरोधी पक्ष एकत्रित येऊन भाजपाला पराभूत करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपा आणि आरएसएसच्या कार्यप्रणालीवर भाष्य करत पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्याकडून शिकण्याचा सल्ला दिल्याचे वृत्त ‘आज तक’ने दिले आहे.

उल्लेखनीय म्हणजे कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल यांनी सुमारे १७ मिनिटे भाषण केले. पक्षाकडून ते यूट्यूबवर अपलोडही करण्यात आले होते. परंतु, काही मिनिटांतच त्यांनी ते हटवले. त्यामुळे राजकीय वर्तुळात याविषयी उलटसुलट चर्चा रंगली आहे.

आपण कठीण प्रसंगी काम करण्यास कचरतो, असे सांगत राहुल यांनी आदिवासी समाजाचे उदाहारण दिले. ते म्हणाले की, दशकापूर्वी आदिवासी समाज काँग्रेसचा मतदार होता. पण भाजपा आणि संघाचे कार्यकर्ते आदिवासींमध्ये गेले. त्यांच्याबरोबर काम केले. त्यांना समजावले आणि आज ते भाजपाचे मतदार बनले आहेत.

भाषणादरम्यान राहुल यांचा उद्देश हा भाजपा आणि संघाकडून केल्या जाणाऱ्या कठोर परिश्रमाची जाणीव काँग्रेस नेत्यांना करून देण्याचा होता. कार्यकर्ते आदिवासी समाजात कार्यरत झाले तर पुन्हा ते काँग्रेसकडे येतील, असे राहुल यांचे म्हणणे होते. त्याचबरोबर भाजपाकडून हजारो वर्षांपूर्वीच्या इतिहासाबद्दल भाष्य केले जाते. पण काँग्रेस नेहमी भविष्यावर चर्चा करते, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत.