राजस्थानमधील काँग्रेस नेते सी पी जोशी यांच्या वादग्रस्त विधानांमुळे काँग्रेसची कोंडी झाली असतानाच शेवटी राहुल गांधी यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. ‘सी पी जोशी यांचे विधान हे काँग्रेस पक्षाच्या आदर्शांविरोधात आहे. पक्षाच्या नेत्यांनी समाजाच्या भावना दुखावतील असे विधान करु नये’, अशी तंबीच राहुल गांधी यांनी दिली आहे.

नाथद्वारा येथे प्रचारसभेत सी पी जोशी यांनी नरेंद्र मोदी आणि उमा भारती यांच्या जात आणि धर्मावर प्रश्न उपस्थित केले आहे. धर्माबद्दल फक्त ब्राह्मणांनाच माहित असते, असेही त्यांनी म्हटले होते. सी पी जोशी यांच्या विधानावरुन भाजपा नेते आक्रमक झाले होते. सी पी जोशी यांनी राजकारणात खालची पातळी गाठली, अशी प्रतिक्रिया भाजपाच्या गोटातून येत होती. तर काँग्रेसने याबाबत भाष्य केले नव्हते.

अखेर राहुल गांधी यांनी शुक्रवारी सकाळी ट्विटरद्वारे सी पी जोशी यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘सी पी जोशी यांचे विधान काँग्रेसच्या आदर्शांविरोधात आहे. नेत्यांनी समाजाच्या भावना दुखावतील असे कोणतेही विधान करु नये. काँग्रेसच्या विचारसरणीचा आणि कार्यकर्त्यांच्या भावनेचा विचार करुन जोशी यांना त्यांची चूक लक्षात येईल, त्यांनी या विधानासाठी खेद व्यक्त केला पाहिजे, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

काय म्हटले होते सी पी जोशींनी ?
उमा भारती लोधी समाजाच्या आहेत आणि त्या हिंदू धर्मावर भाष्य करतात, मोदींचा धर्म कोणता?, असा सवाल त्यांनी विचारला होता. ऋतंभरा यांची जात कोणाला माहित आहे का?, या देशात धर्माबद्दलची माहिती फक्त ब्राह्मणांनाच आहे, असे त्यांनी म्हटले होते.