काँग्रेस नेते गौरव पंधी यांनी कोवॅक्सिन लसीच्या बाबतीत एक धक्कादायक खुलासा केला. त्यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत मिळालेली माहिती ट्विटरवर शेअऱ करत सांगितलं की, भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीमध्ये गायीच्या नवजात वासराच्या रक्तद्रवाचा वापर केला आहे.

त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती अधिकार कायद्यांतर्गत मिळालेली माहिती शेअर केली आहे. ही माहिती केंद्रीय औषध नियंत्रक मंडळाने विकास पटनी या व्यक्तीला दिलेली आहे. विकास पटनी यांनीच ही माहिती मागवली होती.


गौरव पंधी म्हणतात, ही माहिती देताना मोदी सरकारने हे कबूल केलं आहे की कोवॅक्सिनमध्ये गायीच्या नवजात वासराचं रक्तद्रव वापरलं आहे. हे रक्तद्रव २० दिवसांच्या वासराला मारुन त्याच्या गोठलेल्या रक्तातून मिळवलेलं आहे. ही माहिती सार्वजनिक व्हायलाच हवी.

दुसऱ्या ट्विटमध्ये गौरव यांनी कशाप्रकारे हे रक्तद्रव वेगळं करण्यात आलं याबद्दलची माहिती दिली आहे. तर याबद्दल जेएनयू विद्यापीठाचे प्राध्यापक आनंद रघुनाथन यांनी या ट्विटला उत्तर देताना लिहिलं आहे, हे ट्विट डिलीट करा. पहिली गोष्ट म्हणजे कोवॅक्सिन ही लस आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आरोप करताय तसं वासराचं रक्तद्रव नाही. दुसरं या लसीच्या निर्मितीसाठी वारसांची कत्तल कऱण्यात आली नाही. अशा प्रकारचं वासराचं रक्तद्रव फक्त विषाणूच्या अधिक पेशी निर्माण कऱण्यासाठीच वापरण्यात येतं. आणि ही माहिती २०२० पासून सार्वजनिकच आहे.


तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबद्दलचं पत्रक काढत सांगितलं आहे की, अशा प्रकारचा चुकीचा समज पसरवण्याचं काम या सोशल मीडिया पोस्टमधून होत आहे. त्याचप्रमाणे या आशयाच्या सोशल मीडिया पोस्ट्समध्ये तथ्यांसोबत छेडछाड कऱण्यात आलेली आहे. त्याचबरोबर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अशा प्रकारे वासराच्या रक्तद्रवाच्या वापराबद्दल शास्त्रीय माहिती दिली आहे आणि सांगितलं आहे की, कोवॅक्सिनमध्ये थोड्या प्रमाणातही वासराचं रक्तद्रव वापरण्यात आलेलं नाही.