सोनिया, राहुल यांच्या बचावासाठी काँग्रेस नेते सरसावले

नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर करण्यात येणारे आरोप व आक्षेप हे साफ चुकीचे असून, त्यांनी एक रुपयाही घेतलेला नाही, असे स्पष्टीकरण काँग्रेसने रविवारी दिले.
या प्रकरणातील सर्व व्यवहार कायदेशीर असून, न्यायालयीन प्रक्रियेतून सोनिया व राहुल हे दोघेही त्यांचे निर्दोषत्व सिद्ध करतील, असा विश्वास पक्षाचे ज्येष्ठ नेते व कायदेतज्ज्ञ पी. चिदम्बरम व अश्वनीकुमार यांनी व्यक्त केला.
या व्यवहारात काहीही चुकीचे नाही. नफ्यात नसलेल्या एका कंपनीला प्रमुख भागधारक करून, मालमत्तेतील एक रुपयाही खासगी लाभार्थ्यांकडे जाणार नाही हे आम्ही निश्चित केले असल्याचे सांगून एजेएलचे समभाग सोनिया व राहुल हे मोठे भागधारक असलेल्या ‘यंग इंडिया’ कंपनीला हस्तांतरित करण्याच्या कृतीचे चिदम्बरम यांनी समर्थन केले. या दोघांना या व्यवहारात एक रुपयाही मिळालेला नाही, असेही ते म्हणाले.
बंद करण्यात आलेल्या प्रकरणी एका ‘खासगी तक्रारीच्या आधारे’ घाईने कारवाई केल्याबद्दल त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लावले.

प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न- दिग्विजय सिंह
भाजप ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणाआडून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व त्यांचे पुत्र राहुल यांचे प्रतिमाभंजन करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केला. या प्रकरणी पत्रकारांशी बोलताना दिग्विजय म्हणाले की, भाजपकडून ज्या पद्धतीने सोनिया व राहुल यांची बदनामी केली जात आहे, त्याच पद्धतीने इंदिरा व राजीव गांधींना बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला होता असा आरोप केला.

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी नवी दिल्लीत नॅशनल स्ट्रीट फुड फेस्टिव्हलला भेट दिली.