मोदी सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. सुमारे १५ दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर अनेक शेतकरी ठिय्या आंदोलन करत आहेत. अशातच मोदी सरकारवर दबाव आणण्यासाठी शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यासमवेत पाच विरोधी पक्षांचे नेते यांनी ९ डिसेंबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. डाव्या विचारांचे नेते सीताराम येचुरीही या नेत्यांमध्ये होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना हे पाच नेते संध्याकाळी भेटले आणि त्यांच्याशी शेतकरी कायद्याबाबत चर्चा केली. या मुद्द्यावर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी एक खोचक ट्विट केलं होतं. पण त्या ट्विटवरून तेच ट्रोल झाले.

२४ राजकीय पक्षाचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटायला जाण्याआधी दिग्विजय सिंह यांनी एक ट्विट केलं होतं. “२४ राजकीय पक्षांचे शिष्टमंडळ आज शेतकरी विरोधी कायदा मागे घेण्याच्या मागणीबाबत राष्ट्रपतींना भेटायला जात आहे. परंतु मला राष्ट्रपतींकडून यासंदर्भात कोणतीही अपेक्षा नाही. मला वाटतं की या २४ राजकीय पक्षांनी NDAतील घटक पक्षांशी चर्चा करायला हवी ज्यांना शेतकऱ्यांबद्दल आपुलकी असेल. नितीश कुमार यांनीही मोदी सरकारवर दबाव टाकायला हवा”, असे ट्विट त्यांनी केले होते.

आणखी वाचा- शेतकरी आंदोलन : अदानींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आम्ही तर…”

त्यांच्या या ट्विटवर एका युजरने जहरी टीका करत त्यांनाच ट्रोल केलं. “तुमच्यासारखे लोक असंच वागतात. ज्या देशात तुम्ही राहता, ज्या देशाचं मीठ खाता, त्या देशाच्या सरकार आणि राष्ट्रपतींकडून तुम्हाला काहीही अपेक्षा नसते. कारण तुमच्यासारख्यांना इस्लामिक दहशतवादी हाफिज सईद आणि झाकीर नाईक यांच्यासारख्यांकडून अपेक्षा असते. तुमच्यासारख्या नेत्यांवर आम्ही थुंकतो. आम्हाला लाज वाटते की आताच्या काळातील जनतेने तुमच्यासारख्या लोकांना नेता म्हणून निवडलं आहे”, अशा शब्दांत एका युजरने त्यांच्यावर टीका केली. तसेच, इतरही काही युजर्सने त्यांच्या ट्विटचा समाचार घेतला.

दरम्यान, तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी ‘भारत बंद’द्वारे केलेल्या शक्तिप्रदर्शनाची दखल घेत केंद्र सरकारने बुधवारी संघटनांना प्रस्ताव पाठवला होता. मात्र, तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम राहिलेल्या शेतकऱ्यांनी हा प्रस्ताव फेटाळून १४ डिसेंबरला देशव्यापी आंदोलनाची हाक दिली.