राजस्थानातील राजकीय बंडाळी अजूनही शांत झालेली नाही. सचिन पायलट यांनी अजूनही आपली भूमिका जाहीर केली नसून, दुसरीकडे मुख्यमंत्री अशोक गेहलोत सरकार वाचवण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या राजस्थानातील राजकीय नाट्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी भाष्य केलं असून, सचिन पायलट यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी आज माध्यमांशी बोलताना राजस्थानमध्ये सुरू असलेल्या घडामोडींवर भाष्य केलं. तसेच काँग्रेसविरोधात बंड केलेल्या सचिन पायलट यांना परतण्याचं आवाहन केलं. दिग्विजय सिंह म्हणाले, “राजस्थानमध्ये उद्भवलेल्या राजकीय संकटामागे भाजपाचा हाथ आहे. मी सचिन पायलट यांना फोन करण्याचा प्रयत्न केला. पण, ते माझा कॉल घेत नाही. तसेच मी पाठवलेल्या मेसेजलाही त्यांनी उत्तर दिलेलं नाही,” असं दिग्विजय सिंह म्हणाले.

सचिन पायलट यांना आवाहन करताना ते म्हणाले,”वय तुमच्या (सचिन पायलट) बाजूनं आहे. अशोक गेहलोत यांनी जरी तुम्हाला दुखावलं असेल, सगळे मुद्दे सौहार्दाने सोडवले जाऊ शकतात. काँग्रेसमध्ये तुम्हाला चांगलं भविष्य आहे. पण ज्योतिरादित्य शिंदे यांनी जी चूक केली, ती तुम्ही करू नका. भाजपा अविश्वासू पक्ष आहे. दुसऱ्या कोणत्याही पक्षात भाजपात गेलेल्या माणसाला यश मिळत नाही,” असा सल्ला त्यांनी दिला.

“सचिन पायलट हे माझ्या मुलासारखे आहेत. ते माझा सन्मान करतात. मी त्यांना तीन चार वेळा फोन केला आणि मेसेजही केला. पण, त्यांनी उत्तर दिलं नाही. पूर्वी ते लगेच प्रतिसाद द्यायचे. महत्त्वकांक्षी असणं चांगलं आहे. महत्त्वकांक्षेशिवाय कुणी कसं पुढे जाऊ शकतं. पण, महत्त्वकांक्षेबरोबर आपली विचारधारा, संघटना आणि राष्ट्राच्या प्रति उत्तरदायित्व असायला हवं,” असंही दिग्विजय सिंह म्हणाले.