काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशवासीयांना गांधी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच असत्याच्याविरोधात सर्व गोष्टी सहन करण्याची ताकद मिळावी अशी इच्छाही व्यक्त केली आहे. “कोणालाही घाबरणार नाही; कोणत्याही अन्यायासमोर झुकणार नाही,” असंही राहुल गांधी यांवेळी म्हणाले.

“मी या जगात कोणालाही घाबरणार नाही. मी कोणाच्याही अन्यायासमोर झुकणार नाही, मी असत्याला सत्याच्या मार्गानं जिंकेन आणि असत्याचा विरोध करत मला सर्व गोष्टी सहन करण्याची ताकद मिळावी. गांधी जयंतीच्या शुभेच्छा,” असं राहुल गांधी म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून देशवासीयांना गांधी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, गुरूवारी काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या विरोधात महामारी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. उत्तर प्रदेशातील इकोटेक पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला. राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यासह १५३ कार्यकर्ते आणि ५० इतर लोकांवर भारतीय दंड संहितेच्या १५५/२०२०, १८८, २६९, २७० कलमांतर्गत आणि ३ महामारी अ‍ॅक्ट अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला.

गुरुवारी दुपारी हाथरस येथील बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी राहुल आणि प्रियंका गांधी यांनी लाँग मार्च काढला होता. मात्र या दरम्यान राहुल गांधी यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप होत आहे. तर प्रियंका गांधी यांना पोलिसांनी कुटुंबीयांना भेटण्यापासून रोखल्याचा आरोप करण्यात आला. उत्तर प्रदेशातील हाथरस या ठिकाणी करोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लोकांनी गर्दी करण्यास मनाई करण्यात आलेली होती. तसंच सीमेवर बॅरिकेड्सही लावण्यात आले होते. तरीही काँग्रेस नेत्यांनी एपॅडेमिक अॅक्टचं उल्लंघन केल्याचं सांगण्यात येत आहे.