गुजरातमध्ये काँग्रेसच्या सहा आमदारांनी पक्ष सोडून भाजपची वाट धरल्यानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शनिवारी निवडणूक आयोगाची भेट घेतली. गुजरातमध्ये भाजपने लोकशाहीवरच हल्ला केला असून या पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नसतानाही राज्यसभेसाठी तिसरा उमेदवार कुठून मिळाला असा सवाल काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी विचारला.

राज्यसभेच्या जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीपूर्वीच गुजरात काँग्रेसमध्ये राजीनामासत्र सुरु आहे. काँग्रेसच्या सहा आमदारांनी राजीनामा दिला असून यामुळे राज्यसभेची निवडणूक लढवणारे अहमद पटेल यांची कोंडी झाली आहे. सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव असलेले अहमद पटेल यांचा पराभव करण्यासाठी भाजपने काँग्रेसमधून आलेल्या बलवंतसिंह राजपूत यांना उमेदवारी दिली आहे. राजपूत यांच्या विजयासाठी काँग्रेसचे आमदारांना फोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याचा धसका घेत काँग्रेसने ४० हून अधिक आमदारांना बंगळुरुतील एका रिसोर्टमध्ये नेले.

गुजरातमधील घडामोडींचे पडसाद आता दिल्लीतही उमटू लागले आहे. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शनिवारी निवडणूक आयोगाची भेट घेतली. काँग्रेस नेते गुलाम नवी आझाद, आनंद शर्मा, मनिष तिवारी आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. आयोगाच्या कार्यालयाबाहेर काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. आमदारांचे पुरेसे संख्याबळ नसतानाही भाजपने राज्यसभेच्या निवडणुकीत तिसरा उमेदवार का उभा केला, काँग्रेसमधून आयात केलेल्या नेत्याला तिकिट कसे काय दिले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आमदारांना दुसऱ्या राज्यात न्यावे लागते हा राज्य सरकारवर काळा डाग असल्याची टीकाही त्यांनी केली. गुजरात विधानसभेत एकूण १८२ जागा असून भाजपकडे १२१ आमदारांचे संख्याबळ आहे. तर काँग्रेसचे ५७ आमदार होते. मात्र पाच जणांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे.