काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी पक्षावर केलेल्या टीकेमुळे असंतोषाचं वातावरण असतानाच गुलाम नबी आझाद यांनी निवडणुकांमध्ये होणाऱ्या पराभवावरुन पक्षाला घरचा आहेर दिला आहे. तिकीट मिळवणारे नेते आता प्रचारादरम्यान उष्णता आणि धुळीकडे पाठ फिरवतात व त्याऐवजी पंचतारांकित आरामात बसून राहणे पसंत करतात अशी टीका गुलाम नबी आझाद यांनी केली आहे.

“आमच्या नेत्यांची मुख्य समस्या म्हणजे तिकीट मिळाल्यानंतर सर्वात आधी ते फाईव्ह स्टार हॉटेल बूक करणार. तिथेही त्यांना डिलक्स रुम हवा असतो. एसी कारशिवाय ते बाहेर पडणार नाहीत. रस्ते चांगले नाहीत अशा ठिकाणी ते जाणार नाहीत,” अशी टीका गुलाम नबी आझाद यांनी पक्षातील नेत्यांवर केली आहे. “फाईव्ह स्टार हॉटेलमधून निवडणुका लढवल्या जात नाहीत. जोपर्यंत ही संस्कृती बदलत नाही तोपर्यंत आपण जिंकणार नाही,” असंही गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- कपिल सिब्बल म्हणाले,”मी गांधी कुटुंबीयांच्या विरोधात नाही, केवळ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा…”

पक्षाच्या कामगिरीवरुन अनेकांनी नेतृत्वावर टीका केली आहे. त्यासंबंधी बोलताना गुलाम नबी आझाद यांनी मोठ्या पदांवर नेमणूक करण्यात आलेल्या नेत्यांवर निशाणा साधत सांगितलं की, “अनेकजण नेतृत्वाला दोष देत आहेत. पण ब्लॉक किंवा जिल्ह्यातील नेत्यांचा सर्वसामान्यांसोबतचं संपर्क तुटला आहे. जेव्हा कोणाला पद मिळतं तेव्हा ते लेटर पॅड, व्हिजिटिंग कार्ड छापतात आणि आपलं काम संपलं असं समजतात. पण इथेच खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात होते”.

आणखी वाचा- मल्लिकार्जुन खरगेंचं काँग्रेस नेतृत्वाला समर्थन; म्हणाले, “ज्येष्ठ नेत्यांनी…”

आझाद यांनी यावेळी पक्ष नेतृत्व योग्य कामगिरी करत असल्याचं सांगताना म्हटलं की, “मी निवडणूक प्रभारी होतो तेव्हा सोनिया गांधींच्या नेतृत्वात चार ते पाच राज्यांमध्ये विजय मिळाला होता. आम्ही कर्नाटक, केरळमध्ये जिंकलो. तामिळनाडूत युती केली. आंध्र प्रदेशात २००४ मध्ये विजय मिळवला. पक्ष नेतृत्वाने कामकाजात कोणताही हस्तक्षेप केला नाही”.