पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करण्यासाठी काँग्रेसने शक्ती पणाला लावली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणाचा सातत्याने दौरा करत आपल्या पक्षासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत. परंतु, त्यांच्याच पक्षाचे लोक त्यांच्या प्रयत्नांना सुरुंग लावण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. मध्य प्रदेशमधील राऊ विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार जीतू पटवारी यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये पटवारी हे ज्या पद्धतीने मत मागत आहेत, त्यावरुन उमेदवारांना आपल्या पक्षाचा किती आदर आहे, हे दिसून येते.

जीतू पटवारी राऊ विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. जनसंपर्क अभियानादरम्यान ते जनतेला मत मागत आहेत. एका व्हिडिओत पटवारी यांनी एका दाम्पत्याला त्यांनी मतदानाचे आवाहन केले. त्यावेळी ते म्हणाले, माझ्याकडे लक्ष द्या, माझी अब्रू राखा, पक्ष गेला तेल लावत, अशा शब्दांचा वापर त्यांनी यावेळी केला. यावरुन आपल्याच पक्षाप्रती त्यांचे काय मत आहे, हे लक्षात येते. ‘एएनआय’ने यासंबंधीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

मध्य प्रदेश विधानसभेसाठी २८ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. राज्यात गेल्या १५ वर्षांपासून भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे सत्तेत येण्यासाठी काँग्रेस सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यावेळी वातावरण अनुकूल असल्याने काँग्रेसला सत्तेवर येण्याचा विश्वास आहे. येथे त्यांची बसपाबरोबर युती होऊ शकलेली नाही.