News Flash

काँग्रेस खासदार ज्योतिरादित्य सिंधियांना मंदसौरला जाताना अटक, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

कलम १४४ लागू केल्याचे कारण देत सिंधिया यांना मंदसौरमध्ये जाण्यापासून रोखले

मंदसौरमध्ये शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जाणारे काँग्रेस खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांना पोलिसांनी अटक केली आहे. सुरूवातीला मंदसौरमध्ये प्रवेश करण्यापासून पोलिसांनी सिंधिया यांनी रोखले, तरीही त्यांनी ऐकले नाही. त्यानंतर मात्र पोलिसांनी सिंधिया यांना अटक केली. या अटकेनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. मंदसौरमध्ये आम्ही कलम १४४ (जमावबंदीचे कलम)  लागू केले आहे असे पोलिसांनी सिंधिया यांना सांगितले. त्यानंतर सिंधिया यांनी एकटे जाण्यासाठी आग्रह धरला, तरीही पोलिसांनी ऐकले नाही. मग पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्ते यांच्यात वाद झाला ज्यानंतर सिंधियांना अटक करण्यात आली. मी मंदसौरमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार होतो, शेतकऱ्यांना मला दिलासा द्यायचा होता. या सगळ्यात पोलिसांना नेमकी काय अडचण होती ते समजले नाही अशी प्रतिक्रिया सिंधिया यांनी दिली आहे.

याआधी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते.राहुल गांधी यांच्या मंदसौर दौऱ्यावरून चांगलेच राजकारण रंगले होते. पोलिसांनी राहुल गांधी यांना रोखल्यावर ते बाईकवरून मंदसौरमध्ये चालले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मग संध्याकाळी सोडून दिले. शेतकऱ्यांच्या दुर्दशेला पंतप्रधान जबाबदार आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी त्यावेळी केला होता. तसेच आज सकाळी पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनाही पोलिसांनी मंदसौरमध्ये जाण्यापासून रोखले. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर काँग्रेस खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनाही मंदसौरमध्ये जाण्यास मज्जाव केला आणि अटक केली.

मध्यप्रदेशातले शेतकरी १ जूनपासून संपावर गेले आहेत. कर्जमाफी मिळावी ही या शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. तसेच आमच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा असेही या शेतकऱ्यांनी म्हटले आहे, या आणि इतर मागण्यांसाठी हे शेतकरी संपावर गेले आहेत. मात्र पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांवर गोळ्या चालवल्या ज्यामध्ये पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागले. मंदसौरमध्ये तणाव अजूनही कायम आहे त्याचमुळे तिथे कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

मध्यप्रदेश पोलिसांची मुजोरीही वारंवार समोर येते आहे. कमलाबाई नावाच्या ८० वर्षांच्या वृद्धेलाही मारहाण करण्यात आली होती. ही मारहाण इतकी जबरदस्त होती की कमलाबाईंचा हात फ्रॅक्चर झाला. त्या आंदोलनात सहभागी नसूनही त्यांना का मारहाण करण्यात आली याचे उत्तर मध्यप्रदेशचे पोलीस देऊ शकलेले नाहीत. अशात आता  या आंदोलनावरून राजकारणही तापले आहे. भाजपचे धोरण हे शेतकरी विरोधी असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. तर मंदसौरमधल्या शेतकरी आंदोलनाचा काँग्रेस गैरफायदा घेत असल्याची टीका भाजपने केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2017 4:59 pm

Web Title: congress leader jyotiraditya scindia arrested on way to mandsaur
Next Stories
1 शेतकरी आत्महत्यांमागे कौटुंबिक कारणंही असू शकतात!; मध्यप्रदेशच्या गृहमंत्र्यांचे वक्तव्य
2 आजीची भेट घेण्यासाठी राहुल गांधी इटलीला जाणार
3 इस्रोचे ‘टायमिंग’ चुकले!; INRSS-1 जी उपग्रहातील ३ घड्याळे बंद
Just Now!
X