महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर भाजपाचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी मौन सोडलं. “राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर आम्हाला पुरेसा वेळ दिला नाही, असा आरोप महाराष्ट्रातील विरोधी पक्ष करत आहेत. त्याला काहीही अर्थ नाही ते फक्त राजकारण करत आहेत. वेळ दिला नाही. संधी दिली नाही, याला काहीही अर्थ नाही. कारण विरोधी पक्ष यावर राजकारण करत आहेत,”असं अमित शाह म्हणाले होते. शाह यांच्या विधानाला काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात भाजपा-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. मात्र, शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदाची मागणी करत भाजपापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपानं सत्ता स्थापन करण्यास असमर्थ असल्याचं राज्यपालांना सांगितलं होतं. त्यानंतर शिवसेनेनं वेळ वाढवून मागितला होता. तर राष्ट्रवादीनं सरकार स्थापन करण्यास बहुमत नसल्याचं म्हटलं होतं.

कोणत्याही पक्षाकडून सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यात न आल्यानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या शिफारशीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यानंतर प्रथमच केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी राज्यातील परिस्थितीवर भाष्य केलं. “राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू केली नसती तर भाजपाला काळजीवाहू सरकार चालवायचं आहे,” असा आरोप आमच्यावर झाला असता. पेच निर्माण झाल्यानंतर राज्यपालांचं काही चुकलेलं नाही. १८ दिवस सत्तास्थापनेसाठी कुठेही लागलेले नाही. आता राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करुन सहा महिन्यांचा अवधी दिला आहे. ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांनी जावं आणि सरकार स्थापन करावं,” असं अमित शाह म्हणाले होते.

अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी अमित शाह यांना उत्तर दिलं आहे. “अशा प्रकरणांमध्ये अमित शाह फार अनुभवी आहेत. राजकीय पक्षांना कसं फोडायचं आणि कसं एकत्र आणायचं याबद्दल त्यांना सगळ माहिती आहे. गोवा आणि कर्नाटकाबरोबरच अनेक राज्यांमध्ये त्याची झलक आम्ही बघितली आहे,” असा टोला सिब्बल यांनी लगावला आहे.

सिब्बल हे काँग्रेसचे नेते असून, ज्येष्ठ विधिज्ज्ञ आहेत. राज्यपाल भगतसिहं कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी वेळ वाढवून देण्यास नकार दिला. त्यानंतर या निर्णयाला शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं असून, कपिल सिब्बल हे बाजू मांडणार आहे.