नक्षलवाद्यांना स्फोटके, काडतुसे, औषधे व इतर साहित्याचा पुरवठा करण्याच्या आरोपावरून गडचिरोली पोलिसांनी काँग्रेसचे नेते बंडोपंत मल्लेलवार यांच्याविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी हे साहित्य घेऊन जाणारी एक रुग्णवाहिका जप्त केली असून, ती देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याविरुद्धही गुन्हा दाखल केला.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष असलेल्या बंडोपंत मल्लेलवार यांनी शुक्रवारी नक्षलवाद्यांना साहित्य पुरवण्यासाठी पोर्ला प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र करपे यांच्याकडे रुग्णवाहिकेची मागणी केली. त्यानुसार चालक संदीप चंद्रदास ही वाहिका घेऊन मल्लेलवारांच्या गडचिरोलीतील निवासस्थानी पोहोचला. तेथे नक्षलवाद्यांना देण्यासाठी एके-४७ या बंदुकीची १० काडतुसे, १ किलो जिलेटीन, ४ डिटोनेटर्स, ८ ताडपत्र्या या रुग्णवाहिकेत भरण्यात आला. या सामानासोबत मल्लेलवार यांनी विवेक धाईत या चालकालाही रुग्णवाहिकेत बसवले. या संपूर्ण घडामोडीची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर भामरागड तालुक्यातील हेमलकसाजवळ सापळा रचण्यात आला. पोलिसांनी या रुग्णवाहिकेची शुक्रवारी सायंकाळी झडती घेतल्यानंतर सर्व प्रकरणाचा उलगडा झाला.

वरिष्ठ केंद्रीय अधिकाऱ्याविरुद्धही गुन्हा :

नक्षलवाद्यांचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या देशभरातील २९ जिल्ह्य़ांमधील प्रशासनाला मदत करण्यासाठी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने नियुक्त केलेल्या ‘प्राइममिनिस्टर फेलो’विरुद्ध शनिवारी गडचिरोलीत नक्षलवाद्यांना मदत करण्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या योजनेंतर्गत महेश राऊत या तरुणाला दक्षिण गडचिरोलीत नेमण्यात आले होते. महेश राऊत हा हर्षांली पोतदार या त्याच्या मैत्रिणीसोबत जहाल नक्षलवादी नर्मदाला भेटण्यासाठी जात असताना त्याला पोलिसांनी पकडल्याचे तसेच यावेळी महेशला घेऊन जाण्यासाठी आलेल्या बंडू उर्फ ऐसू हिचामी व प्रदीप उर्फ पैका पुंगाटी या नक्षलवाद्यांनाही अटक करण्यात आली असल्याचे समजते. एटापल्ली तालुक्यातील ही घटना आहे, असे पोलीस उपमहानिरीक्षक रवींद्र कदम यांनी सांगितले.