काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मुकूल वासनिक वयाच्या ६० व्या वर्षी विवाहबंधनात अडकले आहेत. रविवारी मुकूल वासनिक यांचा विवाहसोहळा पार पडला. मुकूल वासनिक यांनी आपली मैत्रीण रवीना खुरानासोबत लग्न केलं आहे. दिल्लीमधील ‘मौर्या शेरेटॉन’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये काही मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. मुकूल वासनिक आणि रवीना खुराना जुने मित्र आहेत. रवीना खुराना एका खासगी कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहेत.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ट्विट करत मुकूल वासनिक यांच्या लग्नाची माहिती दिली. ट्विट करत त्यांनी मुकूल वासनिक यांना आयुष्याच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी दोघांचे फोटोही शेअर केले.

काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून फोटो शेअर करत शुभेच्छा दिला. यावेळी त्यांनी लिहिलं की, “मी आणि नाजनीन (पत्नी) नवं विवाहित जोडपं मुकूल वासनिक आणि रवीना खुराना आयुष्याच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा देत आहोत. मुकूल वासनिक यांच्याशी माझी पहिली भेट १९८४ तर रवीना यांच्याशी १९८५ मध्ये वर्ल्ड फेस्टिव्हल ऑफ यूथ अँण्ड स्टुडंट्सच्या वेळी मॉस्को येथे झाली होती. मी दोघांसाठी खूप आनंदी आहे. त्यांना खूप आशिर्वाद”.

काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक गहलोत, मनिष तिवारी, अहमद पटेल, अंबिका सोनी, गुलाम नबी आझाद या विवाहसोहळ्याला उपस्थित होते.

मुकुल वासनिक हे काँग्रेसशी निष्ठा असलेल्या नेत्यांपैकी एक आहेत. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून ते तीन वेळा खासदार राहिलेल्या बाळकृष्ण वासनिक यांचे मुकुल वासनिक पुत्र आहेत. मुकुल वासनिक २००९ मध्ये नागपूरमधील रामटेक लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. बुलडाणा मतदारसंघातूनही ते तीनवेळा खासदार होते. १९८४ मध्ये वयाच्या २५ व्या वर्षी संसदेत जाणारे ते सर्वात तरुण खासदार ठरले होते. वासनिक यांनी केंद्रीय मंत्रिपदही भूषवलं. वासनिक हे १९८४ मध्ये राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (एनएसयूए) च्या अध्यक्षपदी निवडून आले. १९८८ मध्ये भारतीय युवा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रं वासनिक यांच्याकडं आली.