काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अखेर समोर आले असून २७ तासांनंतर काँग्रेस कार्यालयात दाखल झाले. यावेळी पी चिदंबरम यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मी लपत नव्हतो, तर वकिलांसोबत मिळून न्यायालयात लढण्याची तयारी करत होतो असं त्यांनी सांगितलं आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणी पी चिदंबरम यांच्याविरोधात ईडी आणि सीबीआयने लूकआऊट नोटीस जारी केली आहे. ईडीचे अधिकारी पी चिदंबरम यांच्या अटकेसाठी गेले होते. मात्र पी चिदंबरम घरी नसल्याने त्यांना मोकळ्या हाती परतावं लागलं होतं. यानंतर पी चिदंबरम नेमके कुठे आहेत याची चर्चा सुरु होती. पण अखेर नाट्यमयरित्या पी चिदंबरम समोर आले असून आपली बाजू मांडली आहे. अवघ्या पाच मिनिटांत त्यांनी आपली पत्रकार परिषद संपवली.

पत्रकार परिषदेदरम्यान पी चिदंबरम यांनी सांगितलं की, “गेल्या २४ तासांत खूप काही झालं आहे. काही गैरसमज झाले होते ते दूर करण्यासाठी मी येथे हजर झालो आहे. आयएनएक्स प्रकरणी मी किंवा माझ्या कुटुंबीयांवर कोणताही आरोप नाही. मी किवा माझा मुलगा कधीही आरोपी नव्हतो. सीबीआय किंवा ईडीकडून कोणतीही चार्जशीट दाखल झालेली नाही”. यावेळी त्यांनी आपल्याविरोधात खोटी माहिती पसरवली जात असल्याचा आरोप केला.

यावेळी त्यांनी मी कोणताही गुन्हा केलेला नाही असं सांगितलं. तसंच मी पळत नव्हतो, रात्रभर मी वकिलांसोबत मिळून न्यायालयीन लढाईसाठी तयारी करत होतो अशी माहिती त्यांनी दिली. तपास यंत्रणा कायद्याचा आदर करतील अशी अपेक्षा आहे असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान पी चिदंबरम यांच्या अटकपूर्व जामीनावर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याचिकेची सुनावणी कोणत्या खंडपीठासमोर घ्यायची याचा निर्णय गुरुवारी संध्याकाळपर्यंत घेतला जाणार आहे. त्या खंडपीठासमोर शुक्रवारी सुनावणी पार पडणार आहे.