काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी ढासळत्या अर्थव्यवस्थेवरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मी देशभरात फिरतो. आता लोक म्हणत आहेत, अच्छे दिन तर आले नाहीत. हे वाईट दिवस कधी जातील. देशातील ढासळत्या अर्थव्यवस्थेविरोधात अर्थतज्ज्ञांनी आता न घाबरता बोलले आणि लिहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

चिदंबरम यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ढासळत्या अर्थव्यवस्थेवरून मोदी सरकारला घेरले. यावेळी त्यांनी भाजपचेच ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी सरकारवर केलेल्या टीकेचाही उल्लेख केला. काँग्रेस मागील १८ महिन्यांपासून अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करत आहे. यशवंत सिन्हा यांनी सरकारविरोधात आम्ही करत असलेल्या टीकेचाच पुनरूच्चार केल्याने आम्ही आनंदी असल्याचे ते म्हणाले.

विशेष म्हणजे यशवंत सिन्हा हे वाजपेयी सरकारमध्ये अर्थमंत्री होते. त्यांनी देशातील अर्थव्यवस्थेवर चिंता व्यक्त करत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले होते. जेटली यांनी अर्थव्यवस्थेची दुरवस्था केल्याचा आरोप त्यांनी केला.

यशवंत सिन्हा यांच्या टीकेनंतर विरोधी पक्षांनी अर्थव्यवस्थेवरून सरकारवर हल्लाबोल तीव्र केला. सिन्हा यांच्या वक्तव्यानंतर चिदंबरम यांनी सिन्हा यांनी सत्तेपेक्षा सत्य सांगण्यास प्राधान्य दिल्याचे म्हटले. आता सरकार अर्थव्यवस्था बुडत असल्याचे सत्य मान्य करेल का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

ते सिन्हा यांचा हवाला देत म्हणाले की, ५.७ टक्के विकास दर असल्याचे सांगितले जाते.  पण वस्तुस्थिती वेगळीच आहे. विकासदार ३.७ टक्क्यांपेक्षाही कमी आहे. लोकांच्या मनात भीती निर्माण करणे हे या नव्या खेळाचे नाव आहे, असे ट्विट त्यांनी केले. ‘शाश्वत सत्य: सत्ता काय करते, याला महत्व नाही. अंतत: सत्याचा विजय होईल, असेही त्यांनी म्हटले.