पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका युगाचा आरंभ केला, जनसामान्यांना ते अत्यंत जवळचे वाटावेत, अशी प्रतिमा त्यांनी निर्माण केली, अशा शब्दांत ज्येष्ठ काँग्रेस नेते जनार्दन द्विवेदी यांनी पंतप्रधानांवर स्तुतिसुमने उधळली. मात्र त्यावरून खळबळ उडाल्याने लागलीच त्यांनी सारवासारव करीत आपल्या विधानांचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला.
पंतप्रधानांविषयी आपण केलेली विधाने संदर्भ तोडून माध्यमांनी रंगवली. आपण केवळ २०१४ च्या लोकसभा निवडणुकांचे विश्लेषण करीत होतो, असे द्विवेदी यांनी नंतर स्पष्ट केले. या निवडणुका म्हणजे भाजप किंवा मोदींचा विजय नसून काँग्रेसचा पराभव आहे, असे त्यांनी नमूद केले.
मुलायम यांची वाजपेयीस्तुती
भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी हे उत्तम पंतप्रधान होते, महिलांना आरक्षण देण्याची आपली मागणी त्यांनी स्वीकारली. तथापि, पक्षातील काही विघ्नसंतोषी नेत्यांनी त्यांना नीट कारभार करू दिला नाही, असे सपाचे नेते मुलायमसिंह यादव यांनी म्हटले आहे. महिलांसाठी १५ ते २० टक्के आरक्षण निश्चित केले असते तर पक्षांनी नोंदणी रद्द होण्याच्या भीतीपोटी महिलांना आणखी दोन टक्के उमेदवारी दिली असती. वाजपेयी यांनी आपले मत त्याबद्दल जाणून घेतले होते. तुमची मागणी चांगली आहे, मात्र २५ टक्के जास्तच होते, असे  ते म्हणाले होते.