आमदारांच्या घोडेबाजाराच्या आरोपानंतर राजस्थानात राजकीय संघर्ष उफाळून आला. हा संघर्ष अजूनही थांबलेला नाही. अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट असा संघर्ष मागील आठवडाभरापासून बघायला मिळत आहे. राज्यातूल सुरू झालेला हा संघर्ष आता न्यायालय आणि राजभवनापर्यंतही पोहोचला आहे. यादरम्यान काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

“संकटाच्या वेळीच नेतृत्वाची ओळख पटते. करोनासारख्या राष्ट्रीय संकटात देशाला जनतेच्या हितासाठी काम करणाऱ्या नेतृत्वाची आवश्यकता आहे. परंतु केंद्रातील भाजपा सरकार जनतेद्वारे निवडून आलेली सरकारं पाडण्याचा आपला हेतू स्पष्ट केला आहे. जनता त्यांना उत्तर देईल,” असं प्रियंका गांधी म्हणाल्या. त्यांनी ट्विटरवरून भाजपावर निशाणा साधला.

संघवी यांनीही साधला निशाणा

राज्यपाल केंद्रात बसलेल्या मास्तरांचाच सूर आवळत आहेत, असा आरोप काँग्रेसचे नेते अभिषेक मनू संघवी यांनी केला आहे. “राज्यपाल अनेक गोष्टींपासून अनभिज्ञ आहेत. तसंच करोना संकटादरम्यान कोणत्या राज्याची विधानसभा सुरू आहे असा सवालही त्यांनी केला होता. देशात अनेक राज्यांच्या विधानसभांचं कामकाज सुरू आहे. यामध्ये पुदुच्चेरी, महाराष्ट्र आणि बिहारचाही समावेश आहे. राज्यपालांनी याबाबत माहिती घ्यायला हवी,” असंही ते म्हणाले.

“राज्यपालांनी प्रश्न विचारले आणि ते सक्रिय आहेत हे चांगलंच आहे. परंतु आमदारांची उपस्थिती आणि त्यांच्या कामकाजाशी निगडीत प्रश्न हे त्यांच्या अधिकारक्षेत्राखाली येत नाहीत. हे प्रकरण संपूर्णत: विधानसभा अध्यक्ष किंवा संचिवालयाअंतर्गत येतं,” असंही त्यांनी नमूद केलं.