देशातील युवक हेच देशाची मोठी ताकद आहेत. भाजपा सरकारनं त्यांच्याकडून नोकऱ्यांची संधी हिरावून घेत मोठा अन्याय केला आहे. नोकऱ्यांचा अभाव हे देशाचा विकास खुंटण्याचे संकेत असल्याची टीका काँग्रेस नेत्या आणि महासचिव प्रियांका गांधी यांनी केली आहे.

देशात नव्या नोकऱ्यांची निर्मिती न होणं म्हणजे विकासाचा रथ थांबण्याची लक्षणं आहेत. भाजपा सरकारच्या कार्यकाळात या आजारानं मोठ्या आजाराचं रूप घेतलं आहे. बांधकाम क्षेत्रात तब्बल ३५ लाख लोकांच्या नोकऱ्यांवर गदा आली आहे. तर माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील जवळपास ४० लाख लोकांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे, असं म्हणत प्रियांका गांधी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. देशातील युवकच देशाची मोठी ताकद आहेत. भाजपा सरकारनं त्यांच्याकडून संधी हिरावून घेऊन मोठा अन्याय केला असल्याचंही त्या म्हणाल्या. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपावर हल्लाबोल केला आहे.

बुधवारीही प्रियांका गांधी यांनी भाजपावर निशाणा साधला होता. निर्मला सीतारामन यांच्या एअर इंडिया आणि बीपीसीएलच्या विक्रीच्या विधानावरून त्यांनी हल्लाबोल केला होता. सरकार चांगल्या उपक्रमांना खिळखिळं करून ते विकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. आमच्या संस्था आमचा अभिमान आहेत, असंही त्या म्हणाल्या होत्या.