उत्तर प्रदेशातील भानू गुप्ता नावाच्या एका व्यक्तीनं ट्रेनसमोर येऊन आत्महत्या केली. त्यानं त्यापूर्वी एक भावूक करणारं आणि आपल्या व्यथा मांडणारं पत्र लिहिलं होतं. तसंच त्यानं आपण आत्महत्या का करत आहोत हेदेखील सांगितलं होतं. दरम्यान, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी हे पत्र शेअर करत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जरूर वाचावं अशी विनंती त्यांनी केली आहे.

“उत्तर प्रदेशातील भानू गुप्ता यांनी ट्रेनसमोर येऊन आत्महत्या केली ही अतिशय दु:खद घटना आहे. त्यांच काम बंद बंद झालं होतं. तसंच त्यांना आपल्या आईचे उपचारदेखील करायचे होते. सरकारकडून केवळ रेशन मिळालं होतं. परंतु आणखीही काही गोष्टी आवश्यक असतात त्या खरेदी कराव्या लागतात आणि काही गरजाही असतात असं पत्रात त्यांनी म्हटलं आहे.” असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. त्यांनी यासंबंधी एक ट्विट केलं आहे. “हे पत्र कदाचित वर्षपूर्तीच्या पत्राप्रमाणे गाजावाजा करत तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. परंतु एका हे पत्र तुम्ही वाचाच. भारतात आजही अनेक जण अशाच परिस्थितीचा सामना करत आहेत,” असंही त्यांनी नमूद केलं आहे.

आणखी वाचा- … हे लवकर विसरता येणार नाही; मायावती यांचा नरेंद्र मोदींना चिंतन करण्याचा सल्ला

काय म्हटलंय पत्रात?

आत्महत्या करण्यापूर्वी भानू गुप्ता यांनी एक पत्र लिहिलं होतं. “मी गरीबी आणि बेरोजगारीमुळे आत्महत्या करत आहे. सरकारच्या मदतीतून गहू आणि तांदूळ मिळत आहे, परंतु साखर, दुध, डाळ, मसाले यांची विक्री करणारे आता आम्हाला उधारीवर काहीही देत नाहीत. तसंच लॉकडाउन वाढत चालला आहे. पण कुठे नोकरीही मिळत नाही,” असं त्या पत्रात नमूद करण्यात आलं होतं. २९ मे रोजी त्यांच्या मृतदेहाजवळ हे पत्र सापडलं होतं. भानू गुप्ता हे लखीमपुर जिल्ह्यानजीक असलेल्या शाहजहांपूरमधील एका हॉटेलमध्ये काम करत होते. लॉकडाउनमुळे हे हॉटेल बंद झालं आणि त्यांचा रोजगार गेला, असं स्थानिक माध्यमाद्वारे सांगण्यात आलं.