तब्बल २२ वर्षांनंतर फायटर जेट हे हवाईदलाच्या ताफ्यात बुधवारी दाखल झाले. पहिल्या टप्प्यातील पाच राफेल विमानं बुधवारी भारतात आली. भारतातही या लढाऊ विमानांचं जंगी स्वागत करण्यात आलं. दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांदेखील राफेल विमानं हवाईदलाच्या ताफ्यात सामिल झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. याव्यतिरिक्त त्यांनी सरकारला काही प्रश्नही विचारले आहेत.

“राफेलसाठी हवाईदलाचं अभिनंदन. पण यादरम्यान सरकारनं उत्तर द्यावं की प्रति विमान ५२६ कोटी रूपयांऐवजी १६७० कोटी रुपये का देण्यात आले?, एकूण १२६ विमानांऐवजी ३६ विमानांची खरेदी का करण्यात आली?, हिंदुस्तान एअरॉनॉटिक्स लिमिटेडऐवजी दिवाळखोर झालेल्या अनिल अंबानी यांना ३० हजार कोटींचं कंत्राट का देण्यात आलं?,” असे सवाल राहुल गांधी यांनी केले आहेत. त्यांनी ट्विटरवरून केंद्र सरकारला हे प्रश्न विचारले.

काय आहेत राफेलची वैशिष्ट्ये ?

राफेलला सुपरस्टार ऑफ द स्काय म्हटलं जातं. त्यामागे कारण सुद्धा तितकचं खास आहे. एसयू-३५, मिग-३५ आणि युरोफायटर टायफून या स्पर्धक कंपन्यांच्या फायटर विमानांच्या तुलनेत राफेल पूर्णपणे उजवं आहे. शत्रूच्या शक्तीस्थळांवर अचूक प्रहार करुन स्वत:चा बचाव करण्याचं तंत्रज्ञानामुळे राफेल इतर विमानांपेक्षा वेगळं ठरतं.

राफेलचं वैशिष्टय म्हणजे ते एका मल्टीरोल फायटर विमान आहे. राफेलचा जन्म होण्याआधी टेहळणी, बॉम्बिंग, अण्वस्त्र हल्ला यासाठी वेगवेगळी विमानं लागायची. पण आता एकटे राफेल ही सर्व कामे करण्यासाठी सक्षम आहे. आठ विमानांची काम एकटं राफेल करु शकते. म्हणून या विमानाला मल्टीरोल फायटर जेट म्हटलं जातं. राफेलचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या विमानाची इलेक्ट्रॉनिक सिस्टिम, रडार आणि शस्त्रास्त्र विकसित करण्याचं काम सतत सरु असतं. त्यामुळे आज फोर प्लस जनरेशनचं असलेलं हे विमान उद्या ५ जनरेशनमध्ये बदलल्यास आश्चर्य वाटणार नाही. राफेल विमान हे फ्रान्सच्या इंजिनिअरींग कौशल्याचं उत्तम उदाहरण आहे. या विमानात २५ किलोमीटर वायरींग असून ३० हजार प्रिसिशन पार्ट्स आहेत. असंख्य इलेक्ट्रॉनिक सर्किट या विमानात आहेत. २० हजार मीटर उंचीवरुन उड्डाण करु शकणाऱ्या या विमानाचा ताशी वेग २,१३० किलोमीटर आहे.

हवाई युद्धामध्ये शत्रूने तुम्हाला शोधण्याआधी तुम्ही त्याला शोधून संपवणं महत्वाचं असतं. त्या दृष्टीन राफेलमध्ये क्रांतीकारी तंत्रज्ञान आहे. राफेलच्या नाकामध्ये मल्टीडायरेक्शनल रडार सिस्टिम आहे. युरोपमध्ये हे युनिक तंत्रज्ञान आहे. १०० किलोमीटरच्या रेंजमधील एकाचवेळी ४० टार्गेट शोधण्याची क्षमता यामध्ये आहे. राफेलच्या कॉकपीटजवळ छोटया चेंडूच्या आकाराचा ऑप्टीकल कॅमरा सुद्धा या विमानाचं शक्तीस्थळ आहे. रडारने शोधलेल्या टार्गेटसचा माग या कॅमेऱ्याच्या मदतीने काढता येतो. हा कॅमेरा म्हणजे विमानाची दुर्बिण आहे. त्यामुळे राफेलची अचूकतेने प्रहार करण्याची क्षमता कैकपटीने वाढते. राफेलमध्ये एक खास डिजिटल कॅमेरा बसवलेला असून विमान कितीही स्पीडमध्ये असले तरी हा कॅमेरा लक्ष्याचे अचूक फोटो काढू शकतो. स्पेक्ट्रा हे राफेलचं सुरक्षा कवच आहे. स्पेक्ट्रा शत्रूचे रडार जॅम करते. त्यामुळे शत्रूच्या रडारला राफेलचा शोध लावता येत नाही. विमानाच्या दिशेने येणाऱ्या क्षेपणास्त्राची माहिती सुद्धा स्पेक्ट्रा सिस्टिमकडून मिळते. रडार जॅम केल्यानंतरही एखादे क्षेपणास्त्र विमानाच्या जवळ आले तर विमानातून निघणारे इलेक्ट्रो मॅग्नॅटिक प्लस विमानाच्या दिशेने येणाऱ्या क्षेपणास्त्राची दिशा बदलतात. हे विमान बनवताना शक्य तितके स्टेल्थ तंत्रज्ञान वापरुन शत्रूच्या हाताला लागणार नाही अशा पद्धतीने बनवण्यात आले आहे.