सध्याच्या घडीला आपला देश हा मोदी निर्मित संकटांच्या चक्रव्युहात अडकला आहे अशी कडवी टीका काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केली आहे. सध्याच्या घडीला आपला देश हा अनेक मोदी निर्मित संकटांनी घेरला गेला आहे. त्यापैकी एक मोठं संकट आहे ते म्हणजे खासगीकरण. मोदी सरकार PSUs चं खासगीकरण करुन रोजगार आणि जमा असलेला खजिना रिता करतं आहे यामध्ये फायदा होतो आहे तो फक्त मोदींच्या काही मित्रांचा. विकास होतोय मोदींच्या मित्रांचा जे त्यांचे खास आहेत या आशयाचं ट्विट करुन राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे. एवढंच नाही तर खासगीकरण थांबवा आणि सरकारी नोकऱ्या वाचवा असंही आवाहन त्यांनी त्यांच्या ट्विटच्या शेवटी केलं आहे.

६ तारखेलाच त्यांनी जीडीपीच्या घसरणीवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. जीडीपीच्या घसरणीचं मोठं कारण म्हणजे जीएसटी असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. आता त्यापाठोपाठ खासगीकरणावरुनही त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. एवढंच नाही तर करोना संकटावरुनही त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. मोदी सरकार प्रत्येक संकटाचं उत्तर शोधण्याऐवजी शहामृगासारखं तिथून पळ काढतं. प्रत्येक चुकीच्या स्पर्धेत देश पुढे गेला आहे. मग ते करोना बाधितांची संख्या असो किंवा जीडीपीची घसरण अशा आशयाचंही एक ट्विट करुन त्यांनी मोदी सरकारच्या कारभारावर ताशेरे झाडले आहेत. तसंच आता खासगीकरणावरुनही त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.