कृषी कायद्यांवरून मोदी सरकारला सातत्यानं लक्ष्य करत असलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला. आसाममध्ये झालेल्या प्रचारसभेतून राहुल गांधी यांनी सीएएविरोधात (सुधारित नागरिकत्व कायदा) आवाज उठवला. काही झालं तरी सीएए लागू होऊ देणार नाही, असा इशारा राहुल यांनी मोदी सरकारला दिला.

आसाम विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सुरूवात केली. शिवसागर जिल्ह्यातील शिवनगर बोर्डिंग फिल्डमध्ये राहुल गांधी यांची सभा झाली. यावेळी राहुल यांनी आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांची स्तुती करताना मोदी सरकारवर टीका केली. राहुल गांधी म्हणाले,”आम्ही हा रुमाल गळ्यात घातला आहे. यावर सीएए लिहिलेलं आहे. त्यावर आम्ही क्रॉसचं चिन्हं लावलेलं आहे. म्हणजे काही झालं तरी सीएए लागू होणार नाही. ‘हम दो, हमारे दो’वाल्यांनो नीट ऐका, सीएए लागू होणार नाही. कधीही होणार नाही,” असा इशारा राहुल गांधी यांनी दिला.

“अवैध स्थलांतरणाचा मुद्दा सोडवण्याची क्षमता आसामच्या जनतेमध्ये आहे. आसाम भारताच्या गुलदस्त्यातील फूल आहे. आसामला नुकसान झालं, तर देशाचं नुकसान होईल. ‘हम दो, हमारे दो’ बाकी सगळे मरा. जे ‘हम दो, हमारे दो’वाले आसामला चालवत आहेत. ते आसाममध्ये येऊन आग लावतील. आसाममध्ये जे आहे, ते लुटून नेतील. द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करतील, पण इथली जनता आणि काँग्रेस मिळून त्यांना उत्तर देईल,” असं राहुल गांधी म्हणाले.

“रिमोटच्या मदतीने टीव्ही चालवू शकतो, आसाम नाही चालवू शकत. इथल्या जनतेचा मुख्यमंत्री आसामचाच असायला हवा. आपल्या मुख्यमंत्र्यांनी आसामसाठी काम करायला हवं. आसामचे सध्याचे मुख्यमंत्री दिल्ली आणि गुजरातच्या इशाऱ्यांवर काम करता. त्यामुळेच आपल्याला या सरकारला हटवायचं आहे,” असं आवाहन राहुल गांधी यांनी यावेळी जनतेला केलं.