काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सर्वस्व गमावलेल्या दोन बहिणींना दिलेला शब्द पाळला. राहुल गांधी यांनी कार्तिका आणि काव्या यांना नवीन घर देण्याचं आश्वासन दिलं होतं. २०१९ मधील कवलप्परा दुर्घटनेत दोन्ही बहिणींनी आपली आई तसंच भावांना गमावलं होतं. राहुल गांधी यांनी दुर्घटनेनंतर दौरा करताना दोन्ही बहिणींना नवीन घरं देण्याचं आश्वासन दिलं होतं. हे आश्वासन राहुल गांधींनी पाळलं असून दोघींकडे नवीन घराच्या चाव्या सूपूर्द केल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी दोन्ही बहिणींना चाव्या प्रदान केल्या. ८ ऑगस्ट २०१९ मध्ये झालेल्या दुर्घटनेत ५९ लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. तर ६९ कुटुंबाचं डोक्यावरील छत गेलं होतं. दुर्घटनेत कार्तिका आणि काव्या यांची आई आणि तीन भावांचा मृत्यू झाला होता. कार्तिका आणि काव्या शिक्षणासाठी दुसऱ्या ठिकाणी असल्याने या दुर्घटनेतून वाचल्या होत्या.

राहुल गांधी यांनी दुर्घटनेनंतर कार्तिका आणि काव्याची भेट घेत आपल्याला शक्य ती सर्व मदत करु असं आश्वासन दिलं होतं. राहुल गांधी यांनी केलेल्या मदतीमुळे मुलींना दिलासा मिळाला आहे. “दुर्घटनेनंतर जेव्हा ते आम्हाला भेटले तेव्हा त्यांनी आम्हाला घराची ऑफर दिली होती. गेल्या भेटीवेळी त्यांनी आमच्यासाठी मिळवलेल्या जमिनीची कागदपत्रं दिली आणि यावेळी त्यांनी घराच्या चाव्या दिल्या आहेत. पुन्हा एकदा सामान्य आयुष्य जगण्यासाठी मिळत असल्याने आम्ही आनंदी आहोत,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

जमीन विकत घेण्यासाठी तसंच घर उभारण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी ११ लाख रुपये जमा केले होते. कार्तिकाने नुकतंच हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण पूर्ण केलं असून नोकरी करत आहे. तर काव्यानेदेखील नर्सिंगचा कोर्स पूर्ण केला असून लवकरच कामावर रुजू होणार आहे. राज्य सरकारने दुर्घटनेनंतर दोन्ही बहिणींना आठ लाखांची मदत दिली असून केंद्र सरकारकडून ९५ हजारांची मदत देण्यात आली आहे.