करोना परिस्थितीवरून विरोधक सतत मोदी सरकारवर टीका करत आहे. देशात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. देशातील लसीकरण सुद्धा ठप्प झाले आहे. विरोधकांनी मोदींनी विदेशात लशी पाठवल्यामुळे लशीची कमतरता जाणवत असल्याचे म्हटले आहे. भारतात गेल्या काही दिवसांत करोनाच्या रोजच्या घटनेत घट झाली आहे, परंतु मृत्यूची संख्या कमी होत नाही. दुसरीकडे, देशातील बर्‍याच राज्यांत लशीच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

राहुल गांधी म्हणाले, “देशात लसीकरण कमी होत आहे आणि करोनामुळे मृत्यू वाढत आहेत. लक्ष भटकवणे, खोट्या गोष्टी पसरवणे आणि तथ्य लपवणे हीच केंद्र सरकारची निती आहे.”

राहुल गांधींचे टीकासत्र सुरुच आहे. काल (मंगळवार) देखील त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. देशात करोनाची तिसरी लाट येणार असल्याचे संकेत तज्ञांनी दिले आहेत. तसेच या लाटेचा लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचे बोलल्या जात आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात मुलांना करोनापासून वाचविण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत सर्व तयारी अगोदरच पूर्ण करावी लागेल, असे म्हणत कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता.

आणखी वाचा- मृत्यूचं थैमान! देशात करोनाबळींचा नवा उच्चांक; २४ तासांत २,६७,३३४ आढळले पॉझिटिव्ह

“येणाऱ्या काळात मुलांना करोनापासून संरक्षित करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत बालरोग सेवा आणि लस उपचार प्रोटोकॉल आधीच तयार करणे आवश्यक आहे. भारताच्या भविष्यासाठी मोदी सिस्टिमला झोपेतून उठवणे आवश्यक आहे”, असे राहुल गांधी म्हणाले होते.

तसेच टूलकिट प्रकरणावरुन देखील कॉंग्रेस आणि भाजपामध्ये चांगलीच जुंपली आहे. भाजपा प्रवक्ते संबित पात्रा आणि भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून शेअर केलेल्या काँग्रेसच्या कथित टूलकिटचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलाच तापू लागला आहे. काँग्रेसकडून यासंदर्भात राष्ट्रीय, तसेच राज्यातल्या नेत्यांकडून देखील खुलासे आणि प्रत्युत्तर देण्यात आलं.

आणखी वाचा- Corona in UP: “उत्तर प्रदेश सरकार तिसऱ्या लाटेला मार्ग उपलब्ध करुन देत नंतर तिच्याशी लढणार का?”

महामारीच्यावेळी कॉंग्रेसने ‘टूलकिट’ च्या माध्यमातून सरकारला घेराव घालण्यासाठी अनेक मार्गांनी देशात गोंधळ निर्माण करून राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी यांनी महामारीचा उपयोग पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेला डागाळण्याची संधी म्हणून केला. करोनातील नव्या व्हायरसचे नाव मोदी व्हायरस ठेवण्याच्या सूचना कॉंग्रेस कार्यकर्त्यांना देण्यात आल्या. कॉंग्रेसने परदेशी पत्रकारांच्या मदतीने भारताची बदनामी करण्याचे कसलाही कसूर सोडली गेली नाही, असा आरोप संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत केला होता.