काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्हीव्हीआयपींसाठी विमान खरेदी करण्यावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी ट्रकमधून प्रवास करणाऱ्या भारतीय लष्कराच्या जवानांचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. नॉन बुलेटप्रूफ ट्रकमधून जवानांना शहीद होण्यासाठी पाठवलं जात आहे अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “आपल्या जवानांना नॉन बुलेटप्रूफ ट्रकमधून शहीद होण्यासाठी पाठवलं जात आहे आणि पंतप्रधानांसाठी ८४०० कोटींचं विमान…हा न्याय आहे का ?”. राहुल गांधी यांनी केंद्र सरकारकडून पंतप्रधान आणि राष्ट्रपतींसाठी खरेदी करण्यात आलेल्या व्हीव्हीआयपी विमानांवरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

आणखी वाचा- ‘पंतप्रधान मोदींनी स्वत:साठी ८,४०० कोटीचे विमान विकत घेतले, इतक्या पैशात तर…’

गेल्या आठवड्यात राहुल गांधींनी पंजाबमधील कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी आयोजित सभेत बोलतानाही हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी म्हटलं होतं की, “एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८००० कोटींची दोन विमानं खरेदी केली आहेत. दुसरीकडे चीन आपल्या सीमेवर आहे आणि सुरक्षा जवान सीमेच्या सुरक्षेसाठी थंडीचा सामना करत आहेत”.

आणखी वाचा- पवनचक्क्यांबाबत सूचनांवरून राहुल यांची मोदींवर टीका

राहुल गांधी यांना शेतकरी आंदोलनावेळी ज्या ट्रॅक्टवर बसले होते त्याच्यावर गादी होती असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, मोदींनी ८००० कोटींची दोन विमानं खरेदी केली असून त्यात तर पलंग आहे. फक्त यासाठी कारण डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडेही असंच विमान आहे. ३ ऑक्टोबरला भारताला अमेरिकेकडून दोन बी-७७७ विमानं मिळाली आहेत.