बेरोजगारी ही सध्याच्या घडीला आपल्या देशातली सगळ्यात मोठी समस्या आहे. मात्र याकडे मोदी सरकारने सपशेल दुर्लक्ष केलं आहे. हे चित्र पुढचे सहा महिने असंच राहिलं तर देशातले तरुण पंतप्रधान मोदींना धडा शिकवतील. अशी टीका राहुल गांधींनी केली आहे. आज नरेंद्र मोदी भाषण देत आहेत. मात्र अजून सहा महिन्यांनी ते घराबाहेर पडू शकणार नाहीत. भारतातले बेरोजगार युवक त्यांना असा धडा शिकवतील की त्यांना समजेल रोजगार निर्मितीशिवाय भारताचा विकास अशक्य आहे. ते दिल्ली विधानसभेच्या प्रचारसभेत बोलत होते.

या भाषणानंतर त्यांनी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावरही टीका केली. ” केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. मात्र देशात गेल्या ४५ वर्षातली सगळ्यात मोठी समस्या झालेल्या बेरोजगारीवर काहीही भाष्य केलं नाही. आज देशातला प्रत्येक बेरोजगार तरुण एकच प्रश्न विचारतो आहे की आम्हाला रोजगार कधी मिळेल? मात्र या प्रश्नाचं या सरकारकडे काहीही उत्तर नाही.” असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे राष्ट्रभक्ती शिकवू लागले आहेत. निवडणूक जवळ आल्याचा हा परिणाम आहे. मात्र या दोघांनाही मी सांगू इच्छितो की देशातल्या कुणालाही राष्ट्रभक्ती शिकवू नका देशातला प्रत्येक माणूस राष्ट्रभक्त आहे. ” अशीही टीका राहुल गांधी यांनी केली आहे.