देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजल्यानंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी रोजच ट्विटरच्या माध्यमातून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत. सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरल्याचं ते वारंवार सांगत आहेत. राहुल गांधी पंतप्रधान मोदींवर टीकेचे बाण सोडत असल्याने सत्ताधारी भाजपाही त्याला प्रत्युत्तर देत आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान अहंकारी असल्याचा अप्रत्यक्ष टोला हाणला आहे.

‘एक तो महामारी, उस पर प्रधान अहंकारी’ असं ट्वीट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं आहे. या ट्वीटसोबत त्यांनी सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी अधिकारी सुरेश जाधव यांच्या आरोपांचा दाखला दिला आहे. त्यांनी करोनाच्या उपलब्ध मात्रा आणि जागतिक आरोग्य संघटनेची नियमावली यांचा कुठेही तालमेल लक्षात ठेवला नसल्याचा संदर्भ घेतला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या २४ तासांतील आकडेवारी जाहीर केली आहे. आरोग्य मंत्रालयानुसार देशात मागील २४ तासांत २ लाख ४० हजार ८४२ नवीन करोनबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ३ लाख ५५ हजार १०२ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. गेल्या काही दिवसांपासून केंद्र आणि राज्य सरकारांच्या चिंतेत भर घालणाऱ्या मृतांच्या दैनंदिन संख्येत कोणतीही घट होताना चित्र आहे. गेल्या २४ तासांत देशात ३ हजार ७४१ मृत्यूंची नोंद झाली आहे. देशातील एकूण मृतांची संख्या २ लाख ९९ हजार २२६ वर पोहोचली आहे.