संरक्षण समितीने आयोजित केलेल्या बैठकीतून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्ष सदस्यांनी वॉकआउट केलं. देशाच्या सीमा प्रश्नावर ही बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत लाइन ऑफ अ‍ॅक्चुअल कंट्रोल (LAC)च्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली. मात्र समिती अध्यक्षांनी चर्चा करण्यास नकार दिल्याचं बोललं जात आहे. यामुळे संतापलेल्या काँग्रेस नेत्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला आणि बाहेर पडले. याबाबतचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

समितीचा अजेंडा २९ जून रोजीच ठरला होता. मात्र राहुल गांधी अजेंड्यात नसलेल्या विषयावर चर्चा करत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळेच अध्यक्षांनी त्यांची विनंती फेटाळली असल्याचं बोललं जात आहे. यापूर्वी राहुल गांधींनी डिसेंबर २०२० मध्येही संरक्षण समितीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. त्यावेळेसही अजेंड्या व्यतिरिक्त पूर्व लडाखमध्ये देशाची काय तयारी आहे?, चीनबाबत रणनिती काय आहे?, असे प्रश्न उपस्थित केले होते. तेव्हाही त्यांना असे प्रश्न उपस्थित करण्यास मनाई करण्यात आली होती.

काँग्रेस नेते राहुल गांधी सीमा प्रश्न आणि LACच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. चीनी सैनिक भारतीय हद्दीत घुसले असल्याचा आरोप ते वारंवार करत आहेत. त्याचबरोबर चीनने भारतीय जमिनीवर ताबा मिळवल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच पंतप्रधान मोदी चीनला घाबरत असल्याची टीकाही केली होती. बुधवारी त्यांनी एक ट्वीट करत मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. “मोदी सरकारच्या परराष्ट्र आणि संरक्षण नितीमुळे आपल्या देशाला कमकुवत केलं आहे. भारत यापूर्वी कधीच इतका असुरक्षित नव्हता”, असं ट्वीट त्यांनी केलं होतं.