देशात करोना स्थितीला संपूर्ण केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी वारंवार करत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी केंद्रातील मोदी सरकारवर टीकेचा भडीमार करता करता काही सल्लेही देत आहेत. आता राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून करोना म्यूटेशन ट्रॅक करण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर सर्व प्रकारच्या म्यूटेशनवर लवकरात लवकर व्हॅक्सिन चाचणी करावी असंही सांगितलं आहे. तसेच लसीकरण वेगाने करण्याची आग्रही मागणीही केली आहे.

‘देशातील करोना स्थिती पाहता तुम्हाला पुन्हा पत्र लिहावं लागत आहे. देशावरील संकट पाहता भारतीय नागरिकांना प्राथमिकता देणं गरजेचं आहे. देशातील नागरिकांना या समस्येतून काढण्यासाठी जे शक्य होईल ते करा, अशी मी तुम्हाला विनंती करतो’, असं त्यांनी आपल्या पत्रात लिहीलं आहे. हे पत्र काँग्रेसनं आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर पोस्ट केलं आहे.

‘जेव्हा करोना पसरत होता तेव्हा करोनावर विजय मिळवल्याच्या आवेशात राहीले. केंद्राच्या अपयशामुळेच आता देशात लॉकडाऊनची स्थिती उद्भवली आहे.’, अशी टीका राहुल गांधा यांनी या पत्रात केली आहे. केंद्र सरकारकडे लसीकरणासाठी स्पष्ट रणनिती नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

“सरकार संवेदनशील, तत्पर, कष्टाने काम करणारं असल्याची सकारात्मक प्रतिमा निर्माण करुन लोकांपर्यंत पोहचवा”

राहुल गांधी यांनी पत्र लिहिण्यापूर्वी सकाळी ट्विटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. “सेंट्रल व्हिस्टा हा एक गुन्हेगारी स्वरुपातील अपव्यय आहे. लोकांच्या जीवनाचा प्रश्न असताना नवं घर मिळवण्यासाठी आंधळा अहंकार नको”, असा टोला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवरून मोदी सरकारला मारला आहे.