काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान झाल्यावर वस्तू आणि सेवा कराचा आढावा घेण्यात येईल, असे उत्तर प्रदेशमधील काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी म्हटले आहे. वस्तू आणि सेवा कर १८ टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही, याची काळजी काँग्रेसकडून घेण्यात येईल, असेही ते म्हणाले. वस्तू आणि सेवा करात केले जाणारे बदल छोटे व्यापारी, शेतकरी आणि तरुणांच्या हिताचे असतील, असेही राज बब्बर यांनी स्पष्ट केले.

‘राहुल गांधी पंतप्रधान झाल्यावर वस्तू आणि सेवा कर कायद्याचा आढावा घेतला जाईल. वस्तू आणि सेवा कर १८ टक्क्यांपेक्षा जास्त नसेल, याची काळजी काँग्रेसकडून घेण्यात येईल’, असे राज बब्बर यांनी म्हटले. ते माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी समारंभात बोलत होते. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून राष्ट्रवादाच्या नावाखाली देशातील तरुणांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. ‘काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वत:चे सामर्थ्य ओळखून भाजपच्या ढोंगी नेत्यांविरोधात संघर्ष करण्यासाठी सज्ज व्हावे,’ असे आवाहन त्यांनी केले.

‘राहुल गांधी पंतप्रधान झाल्यावर भाजप सरकारच्या काळात झालेल्या अनेक चुका लोकांसमोर आणतील. यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी भाजपला सत्तेतून खाली खेचणे आवश्यक आहे. देशाला पुन्हा रुळावर आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी योगदान द्यायला हवे. तरुणांची दिशाभूल करणाऱ्या भाजप आणि संघाचा खरा चेहरा लोकांसमोर आणायला हवा,’ असेही राज बब्बर यांनी म्हटले. काँग्रेसच्या नेत्यांनी देशासाठी बलिदान दिल्याचेही ते म्हणाले.

या कार्यक्रमाला काँग्रेस महासचिव आणि खासदार संजय सिंहदेखील उपस्थित होते. ‘राहुल गांधींनी अमेठीसाठी १६ हजार कोटींच्या योजना आणल्या होत्या. मात्र पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्या योजना इतर भागांमध्ये नेल्या,’ असा आरोप सिंह यांनी केला.