आमदारांच्या घोडेबाजाराच्या आरोपानंतर राजस्थानात राजकीय संघर्ष उफाळून आला. हा संघर्ष अजूनही थांबलेला नाही. अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट असा संघर्ष मागील आठवडाभरापासून बघायला मिळत आहे. दरम्यान, या सत्तानाट्यावरून काँग्रेसचे नेते रणदीप सिग सुरजेवाला यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपानं संविधानाची सर्कस केल्याचा आरोप सुरजेवाला यांनी केला आहे.

सुरजेवाला यांनी ट्विट करत भाजपावर हल्लाबोल केला. “भाजपानं संविधानाची सर्कस केली आहे. त्यांनी लोकशाहीला द्रौपदी तर जनमताला बंधक बनवलं आहे. द्रौपदीचं वस्त्रहरण करणाऱ्या कौरवांचं जे झालं होतं तेच राजस्थानची कृष्णरूपी जनता भाजपाच्या कटाचं करेल. आता न्याय मिळेल,” असं सुरजेवाला म्हणाले.

आणखी वाचा- “देशात याआधी असा ‘नंगा नाच’ कधी पाहिलेला नाही”, अशोक गेहलोत यांची टीका

“जेव्हा काँग्रेसकडे बहुमत आहे, सभागृहदेखील भरवायचं आहे, तसंच हा अधिकार सरकारचा आहे तेव्हा भाजपावाले आणि त्यांचे अनुयायी का पाठ दाखवून पळून जात आहे. दिल्लीत सत्तेवर बसलेल्यांना विधिमंडळात बहुमताची भीती का वाटत आहे?,” असा सवालही सुरजेवाला यांनी ट्विटरद्वारे केला आहे.

आणखी वाचा- “…तर मी पायलट यांचे स्वागत करेन”; अशोक गहलोत यांची ‘ऑफर’

आणखी वाचा- राजस्थान सत्ता संघर्ष; सचिन पायलट यांना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

हे भाजपाचं षडयंत्र – गेहलोत

“आमच्याकडे स्पष्ट बहुमत आहे असं वारंवार सांगत आहोत. चिंता आम्हाला असली पाहिजे, पण तेच चिंतेत आहेत. आमच्या काही सहकाऱ्यांना बंधक ठेवण्यात आलं आहे. त्यांनाही कदाचित तेथून सुटका करुन घ्यायची असेल. तिथे पोलीस, बाऊन्सर ठेवण्यात आले आहेत. फोन काढून घेण्यात आले आहेत. केंद्र सरकारला याची काळजी नाही का ? हे सगळं भाजपाचं षडयंत्र आहे,” असा आरोप अशोक गेहलोत यांनी केला.