19 September 2020

News Flash

‘एमबीबीएस’ जागावाटप घोटाळ्याप्रकरणी रशीद मसूद यांना चार वर्षांची शिक्षा

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्यापाठोपाठ न्यायालयाने काँग्रेस नेते रशीद मसूद यांना दणका दिला आहे.

| October 1, 2013 03:01 am

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्यापाठोपाठ न्यायालयाने काँग्रेस नेते रशीद मसूद यांना दणका दिला आहे. वैद्यकीय प्रवेश घोटाळा प्रकरणात दिल्ली न्यायालयाने राज्यसभा सदस्य मसूद यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयाने मसूद यांची खासदारकी धोक्यात आली आहे. याखेरीज दोन निवृत्त नोकरशहांना प्रत्येकी चार वर्षे आणि तसेच नऊ विद्यार्थ्यांना एक वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. यामध्ये मसूद यांच्या पुतण्याचा समावेश आहे.
दोषी आढळलेल्या लोकप्रतिनिधींना अपात्र ठरवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने १० जुलैला दिला आहे. त्यामुळे आता या निर्णयामुळे खासदारकी रद्द होणारे मसूद हे पहिले खासदार ठरतील. चारा घोटाळ्यात लालूप्रसाद यांना न्यायालयाने दोषी ठरवले असून, ३ ऑक्टोबरला त्यांना शिक्षा सुनावली जाणार आहे. काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य असलेले ६६ वर्षीय मसूद १९९०-९१ मध्ये व्ही. पी. सिंह यांच्या कार्यकाळात आरोग्यमंत्री होते. त्या कालावधीत हा प्रवेश घोटाळा झाला. केंद्रीय कोटय़ातून देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये त्रिपुराच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या जागा अपात्र विद्यार्थ्यांना दिल्याप्रकरणी मसूद दोषी ठरले होते. न्यायालयाने मसूद यांना ६० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
सीबीआयने या मसूद यांना सात वर्षांची शिक्षा मागितली होती. कायदे करणारेच कायदे तोडत असल्याचे सीबीआयने न्यायालयात सांगितले. मसूद यांना जबर दंड ठोठवावा अशी मागणी सीबीआयचे वकील व्ही.एन.ओझा यांनी केली. आपल्या पुतण्यासह अपात्र विद्यार्थ्यांना संधी देऊन इतर विद्यार्थ्यांची कारकीर्द उद्ध्वस्त केल्याचे ओझा यांनी न्यायालयात सांगितले.
मसूद यांच्याखेरीज पोलीस सेवेतील माजी अधिकारी गुरुदयाल सिंग आणि अमनकुमार राय यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सिंग यांना दीड लाख तर राय यांना एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर नऊ विद्यार्थ्यांना प्रत्येकी चाळीस हजारांच्या दंडाची शिक्षा झाली आहे. राय हे त्रिपुराचे तत्कालीन मुख्यमंत्री सुधीररंजन मुजुमदार यांचे सचिव होते. या प्रकरणात मुजुमदार आणि त्रिपुराचे तत्कालीन आरोग्यमंत्री काशीराम रेयांग हे आरोपी होते. मात्र खटल्याच्या सुनावणीदरम्यान त्यांचे निधन झाले. देशासाठी दिलेले योगदान आणि वय पाहता मसूद यांना सूट देण्याची मागणी त्यांच्या वकिलाने युक्तीवादादरम्यान केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2013 3:01 am

Web Title: congress leader rasheed masood gets 4 year jail term in mbbs scam case
टॅग India News
Next Stories
1 ‘पंतप्रधानांच्या यशस्वी योजनांमुळे लाखोंची गरिबी दूर’
2 पेट्रोल ३ रुपयांनी स्वस्त; डिझेल महागले
3 ‘कॉंग्रेस सरकारचे केवळ सीबीआय आणि प्राप्तिकर खात्यावर नियंत्रण’
Just Now!
X