“कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या दोन दिवसांपासून भारतीय प्रसार माध्यमातून येत आहेत. भारत सरकारने यावर मौन बाळगले आहे त्यामुळे संशयाचे वातावरण तयार झाले आहे. दाऊदचा खरेच मृत्यू झाला की तो जिवंत आहे हे केंद्र सरकारने एकदाचे ठरवून देशाच्या जनतेला सांगावे,” अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

“दाऊदला कोरोनाची लागण झाल्यानंतर पाकिस्तानच्या कराची येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याच्या बातम्या भारतातील माध्यमातून येत असून यातील सत्य काय आहे याचा खुलासा केंद्र सरकारने करण्याची आवश्यकता आहे. दाऊद हा भारताचा शत्रू असून तो भारतासाठी मोस्ट वॉटेंड आहे. पण २०१४ पासूनच दाऊदच्या मृत्यूच्या बातम्या पसरवण्याचे अनेक योगायोग झाले असून आतापर्यंत सहावेळा दाऊद मरुन जीवंत झाला आहे. मोदी सत्तेवर येताच आता दाऊदची खैर नाही, मोदींच्या नेतृत्वामुळे पाकिस्तान भयभीत झाला असून दाऊदही प्रचंड घाबरला आहे, मोदी पुन्हा सत्तेत आल्यानंतर प्रचंड घाबरलेल्या दाऊदने आयएसआयकडे संरक्षण वाढवून देण्यासाठी फोन केला, अशा बातम्या आल्या होत्या,” असं सावंत म्हणाले. “आश्चर्य म्हणजे या चॅनेल्सची सूत्रे साक्षात आयएसआय पर्यंत पोहोचली आहेत असे ते स्वत:च म्हणतात. मोदी सरकारने संसदेला दिलेल्या उत्तरात दाऊदचा ठावठिकाणा माहीत नाही असे सांगितले होते. म्हणून या वाहिन्यांच्या प्रमुखांना ‘रॉ’चे एजंट केले तर देशाला फायदा होईल,ठ असं ते म्हणाले.

… तेव्हाच हे विषय चर्चेला

“देशातील चॅनेलवर हेडलाईन्स काय यावी हे देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार व मोदींचे तथाकथित जेम्स बाँड अजित डोवाल ठरवत असतात अशी चर्चा सुरू असते. जेव्हा जेंव्हा मोदी सरकारच्या विरोधात जनमत तयार होते, लोकांमध्ये नाराजी निर्माण होते, तेव्हा तेव्हा दाऊदला वाहिन्यांवर मारले जाते हा योगायोग दिसून आला आहे किंवा भारत पाकिस्तान, हिंदू मुस्लिम हे विषय चर्चेला घेतले जातात,” असं सावंत म्हणाले.

चिमुटभर देशही डोळे वटारतो

“दाऊदला फरफटत भारतात आणू अशा वल्गना मोदींसहित भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचारसभेत केल्या परंतु आजपर्यंत दाऊदला भारतात आणण्यात त्यांना काही शक्य झालेले नाही. परंतु दाऊदची बेगम मात्र राजरोसपणे देशात मोदी सरकारच्या कार्यकाळात येऊन परतही गेली. नेपाळ हा भारताचा मित्र राष्ट्र पण आता मात्र हा चिमुटभर देशही भारताला डोळे वटारत आहे. चीनने सीमेवर आगळीक केलेली असून चीनचे सैन्य लडाखमध्ये ६० किलोमीटर भारताच्या सीमेच्या आत आले आहे. परराष्ट्रीय धोरण फसलेले आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

करोनाचे संकट हाताळण्यात अपयश

“करोनाचे संकट हाताळण्यात मोदी सरकारला मोठे अपयश आले आहे. स्थलांतरीत मजुरांचा प्रश्नही सोडवता आला नाही. स्वातंत्र्यानंतर झालेले सर्वात मोठे स्थलांतर झाल्याचे विदारक चित्र जगाने पाहिले आहे. अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजले असून देशभरात मोदी सरकारच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. कोरोनाच्या अपयशामुळे देशात चिंतेचे वातावरण असून सरकारच्या अपयशावर सर्वत्र चर्चा होत असल्यामुळेच आता दाऊदला पुन्हा मारले गेले अशी शंका जनतेला येत आहे. केंद्र सरकारने हा संशय दूर करण्यासाठी खुलासा करुन सोक्षमोक्ष लावावा,” असे सावंत म्हणाले.