28 November 2020

News Flash

“भाजपा हिंदू-मुस्लीम करु लागल्यावर समजून जावे की देशात निवडणूक आहे”

"इंग्रजांविरोधात कोण लढलं होतं आणि त्यांच्या बाजूने कोण होतं हे..."

फाइल फोटो (फोटो सौजन्य : पीटीआय)

जम्मू-काश्मीरमधील प्रमुख राजकीय पक्षांनी केलेल्या ‘गुपकर ठरावा’वरून मंगळवारी वादंग निर्माण झाला.  जम्मू-काश्मीरला अनुच्छेद ३७० अंतर्गत विशेष दर्जा पुन्हा मिळवून देण्याच्या उद्देशाने नॅशनल कॉन्फरस, महेबूबा मुफ्ती यांची पीडीपी आदी राजकीय पक्षांनी ‘गुपकर ठराव’ केला आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांना गुपकर ठरावावरुन एकत्र येणाऱ्या पक्षांच्या आघाडीचे अध्यक्ष पद देण्यात आलं आहे तर पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांना उपाध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं आहे.

या ठरावात सहभागी असलेले पक्ष म्हणजे ‘गुपकर टोळी’ असून, या टोळीसह काँग्रेसला जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा हिंसाचाराचे युग आणायचे आहे, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. ‘‘गुपकर टोळी जागतिक बनू लागली असून, जम्मू-काश्मीरच्या मुद्दय़ावर परदेशी गटांच्या हस्तक्षेपाची मागणी ते करत आहेत. ही टोळी तिरंग्याचा अवमान करत आहे. त्यांच्या देशविघातक कृत्यांना सोनिया व राहुल गांधी यांचा पाठिंबा आहे का? असा सवाल करतानाच काँग्रेसने आपली भूमिका जाहीर करावी,’’ असे आव्हान शहा यांनी ट्वीटद्वारे दिले.

जम्मू-काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदांच्या निवडणुकीचा पहिला टप्पा २५ नोव्हेंबरला आहे. या निवडणुकीच्या तोंडावर अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरच्या प्रादेशिक पक्षांसह काँग्रेसला लक्ष्य केले. याच पार्श्वभूमीवर आज तक या वृत्तवाहिनीवर या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या चर्चेमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते अखिलेश प्रताप सिंह सहभागी झाले होते. यावेळी अखिलेश यांनी भाजपावर कठोर शब्दांमध्ये टीका केली. “इंग्रजांविरोधात कोण लढलं होतं आणि त्यांच्या बाजूने कोण होतं हे सर्वांना ठाऊक आहे. आज इंग्रजांच्या बाजूने उभे राहणारे लोकं स्वत:ला सर्वात मोठे राष्ट्रभक्त म्हणत आहेत. हे लोकं केवळ सत्तेचे भक्त आहेत. याच लोकांनी आयएसआयच्या प्रमुखाला काश्मीमध्ये बोलवलं होतं. त्याला का बोलवण्यात आलं होतं. तो तर देशाचा कट्टर शत्रू आहे. मग राजकीय सन्मानासहीत भाजपावाल्यांनी त्याला का बोलवलं होतं?” असा प्रश्न अखिलेश यांनी या चर्चेदरम्यान उपस्थित केला.

आणखी वाचा- … आम्ही आघाडी केली तर तो राष्ट्रद्रोह; अमित शाहांवर मेहबुबा मुफ्तींचा पलटवार

या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालिका अंजना ओम कश्यप यांना एका प्रश्नाला उत्तर देताना अखिलेश यांनी, “देशामध्ये निवडणूक आहे की नाही हे मोजण्याचं एक मोजमाप तयार झालं आहे. हे भाजपावाले जर हिंदू-मुस्लीम, हिंदुस्तान-पाकिस्तान करु लागले की समजून जायचं की देशामध्ये कुठेतरी निवडणूक होणार आहे,” असंही म्हटलं. आता अखिलेख यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी काँग्रेसच्या प्रवक्त्यांच्या वक्तव्याचे समर्थन केल्याचे दिसत आहे. तर काहींनी या वक्तव्याला विरोध केल्याचे चित्र दिसत आहे. भाजपा समर्थकांनी या वक्तव्यावरुन अखिलेश यांना ट्रोल केल्याचे चित्र दिसत आहे.

शाह यांच्या टीकेला उत्तर

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनीही शहा यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही टोळी नसून घटनात्मक पद्धतीने निवडणुका लढवणारे राजकीय पक्ष आहोत. गुपकर आघाडीतील पक्षांनी जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका लढवण्याचे ठरवल्यामुळे शहांना आमच्या आघाडीची अडचण होऊ  लागली असल्याने ते आरोप करत आहेत, असे अब्दुल्ला म्हणाले. आता आघाडी करून निवडणुकीत उतरणे हेदेखील भाजपला देशद्रोही कृत्य वाटू लागल्याची टीका पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी केली आहे.

आणखी वाचा- पीओके, गिलगिट-बाल्टिस्तानमधून पाकिस्तानला बाहेर काढण्यासाठी RSS नेत्याने सुरू केली मोहीम

काँग्रेसची कोंडी

‘गुपकर आघाडी’त सहभागी नसल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. मात्र, ‘गुपकर आघाडी’त सहभागी असलेल्या नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी या पक्षांसह अन्य पक्षांबरोबर जिल्हापातळीवर जागावाटपाबाबत चर्चा झाली, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गुलाम अहमद मिर यांनी सांगितले. तसेच अनुच्छेद ३७० पुनस्र्थापित करण्याच्या मुद्यावरूनही कॉंग्रेसमध्ये वेगवेगळे मतप्रवाह असल्याचे समोर आले आहे. यामुळे ‘गुपकर’वरून काँग्रेसची कोंडी झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2020 3:36 pm

Web Title: congress leader said if bjp start hindu muslim debate then there must be some elections in country scsg 91
Next Stories
1 विमानात महिला पायलट पाहून आजीबाईंना वाटलं आश्चर्य!; क्षणात दिली भन्नाट प्रतिक्रिया
2 १८,०००+… अमृता फडणवीसांच्या गाण्यावर Dislikes चा पाऊस
3 सोशल मीडियावर पहिला पगार सांगण्याची स्पर्धा… जाणून घ्या कारण
Just Now!
X