काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सैफुद्दीन सोझ यांनी हिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीवरुन वादग्रस्त विधान केले आहे. ‘मला शक्य असते तर मी बुरहान वानीला जिवंत ठेवले असते आणि त्याच्याशी चर्चा केली असती’ असे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सैफुद्दीन सोझ यांनी केले आहे.

हिज्बुल मुजाहिद्दीनचा मोस्ट वाँटेड कमांडर बुरहान वानीचा गेल्या वर्षी ८ जुलैरोजी सुरक्षा दलांनी खात्मा केला होता. बुरहान वानीच्या मृत्यूनंतर जम्मू-काश्मीर हिंसाचार झाला होता. या हिंसाचारात सुमारे शंभर आंदोलकांचा मृत्यू झाला होता. तर शेकडो जण या हिंसाचारात जखमी झाले होते. बुरहान वानीच्या मृत्यूवर काँग्रेसचे नेते सैफुद्दीन सोझ यांनी शुक्रवारी भाष्य केले. ‘मला शक्य असते तर बुरहान वानीला जिवंत ठेवले असते. बुरहान वानीला समजावण्याचा प्रयत्न केला असता की भारत, पाकिस्तान आणि काश्मीरमध्ये मैत्रीचा पूल बांधता येईल आणि या कामात त्याची मदत घेतली असती’ असे सोझ यांनी म्हटले आहे. पण आता बुरहानचा मृत्यू झाला असून आपण काश्मिरी जनतेचे दुःख समजून घेतले पाहिजे असेही त्यांनी नमूद केले.

सैफुद्दीन सोझ यांच्या विधानावरुन वाद निर्माण झाला असून भाजपने सोझ यांच्यावर टीका केली आहे. दहशतवाद्याला दहशतवाद्यासारखीच वागणूक दिली पाहिजे. सरकार शांततेसाठी कटिबद्ध असून दहशतवाद्यांचा खात्मा करणे हे सरकारचे ध्येय आहे असे केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांनी सांगितले. तर जम्मू- काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनीदेखील काँग्रेसवर निशाणा साधला. दहशतवाद्यांना नेता म्हणून संबोधित करुन तुम्ही दहशतवाद्यांना प्रोत्साहन देतायं का असा सवाल निर्मल सिंह यांनी विचारला आहे.