तब्बू राव यांच्या पाठोपाठ तेहसीन पूनावाला यांनी पत्नीसोबतचा फोटो टि्वट करुन केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांना आव्हान दिले आहे. तेहसीन पूनावाला यांनी पत्नीला मिठी मारतानाचा फोटो टि्वट करुन तुम्ही जे करु शकता ते करा असे आव्हान अनंत कुमार हेगडे यांना दिले आहे.

तेहसीन पूनावाला यांची पत्नी हिंदू आहे. हिंदू मुलींना स्पर्श करणाऱ्या अन्य धर्मीयांचे हात हिंदू तरुणांनी तोडून टाकले पाहिजेत असे विधान अनंत कुमार हेगडे यांनी रविवारी केले होते. अन्य धर्मातल्या मुलांनी हिंदू मुलींना स्पर्श केला तर हिंदू मुलांनी ते हात तोडून इतिहास रचण्यासाठी सज्ज रहावे असे विधान हेगडे यांनी केले होते.

तब्बू राव यांच्या पाठोपाठ आता तेहसीन पूनावाला यांनी अनंत कुमार हेगडेंना उत्तर दिले आहे. दिनेश गुंडू राव यांच्यावर टीका करताना हेगडे यांनी त्यांच्या पत्नीबद्दल खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य केले होते. गुंडू राव हे एका मुस्लिम महिलेच्या मागे धावणारे व्यक्ती आहेत, असे त्यांनी म्हटले होते. तब्बू राव या कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष दिनश गुंडू राव यांच्या पत्नी आहेत.

एका फेसबुक पोस्टमध्ये तब्बू राव म्हणाल्या की, भाजपासाठी मी एक ‘सॉफ्ट टार्गेट’ बनली आहे. माझ्या पतीचा सामना करण्यात त्यांना अपयश येत असल्यामुळे ते मला लक्ष्य करत आहेत. मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसताना अनंतकुमार यांनी मला उगाच या राजकीय चिखलफेकीत ओढले आहे. हेगडे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना त्या म्हणाल्या की, होय मी जन्माने मुस्लिम आहे. पण मला भारतीय असल्याचा अभिमान आहे. भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचाराचे स्वातंत्र्य, प्रार्थना करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. आपले संविधान धर्मनिरपेक्षतेवर आधारलेले आहे.