पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चांगल्या कामांचं कौतुक करण्याची मागणी केल्याने काँग्रेस नेत्यांच्या टिकेला सामोरं जावं लागलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरुर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानांचं गुणगान गायलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दर दिवशी भारतीय भाषांमधील एक शब्द शिकण्याचा सल्ला दिला आहे. शशी थरुर यांनी या सल्ल्याचं कौतूक केलं असून आपण हे आव्हान स्विकारत असल्याचं सांगितलं आहे. तसंच आपण दरदिवशी एक शब्द हिंदी, इंग्लिश आणि मल्याळम भाषेट ट्विट करणार असल्याचं म्हटलं आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केरळमधील तिरुअनंतपूरम मतदार क्षेत्रातून खासदार असणारे शशी थरुर यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “नरेंद्र मोदींनी आज आपल्या भाषणाच्या शेवटी मातृभाषा सोडून एका अन्य भारतीय भाषेतील शब्द शिकण्याचा सल्ला दिला आहे”. पुढे त्यांनी सांगितलं की, “मी नरेंद्र मोदींच्या या सल्ल्याचं स्वागत करतो आणि आनंदाने भाषेच्या या आव्हानाला पुढे घेऊन जाईल”.

“पंतप्रधान नरेंद्र मोदींच्य़ा भाषेच्या आव्हानाला उत्तर देताना मी दर दिवशी इंग्लिश, हिंदी आणि मल्लाळम भाषेत एक शब्द ट्विट करणार आहे. इतर लोकही असं करु शकतात. आजचा पहिला शब्द बहुलवाद आहे”. शशी थरुर यांनी बहुलवाद शब्द इंग्लिश आणि मल्याळम भाषेतही लिहिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केल्याने शशी थरुर यांच्यावर काँग्रेस नेते टीका करत आहेत. काँग्रेसने याप्रकऱणी त्यांच्याकडे स्पष्टीकरणही मागितलं आहे. स्पष्टीकरण मागणाऱ्यांना उत्तर देताना शशी थरुर यांनी मी माझ्या सहकाऱ्यांना सांगू इच्छितो की, त्यांनी सहमती नसली तरी माझ्या मताचा आदर केला पाहिजे असं सुनावलं होतं.

नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मनोरमा न्यूज कॉन्क्लेव्हचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी बहुभाषिक असणारा भारत जगातील एकमेव देश असल्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधून घेतलं. “भाषेचा फायदा घेत अनेकांनी भारतात स्वार्थापोटी विभागणी करत आपला हेतू साध्य करण्याचा प्रयत्न केल्याची”, खंत नरेंद्र मोदींनी यावेळी व्यक्त केली. “भाषेतही ताकद असून त्याचा वापर करत आपण सर्वांना एकत्र आणलं पाहिजे”, असं नरेंद्र मोदींनी सांगितलं. यासाठी त्यांनी प्रसारमाध्यमांनी पुढाकार घेत वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांना एकत्र आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणं गरजेचं असल्याचं सांगितलं.

“आपण रोज वेगवेगळ्या भाषेतील १० ते १२ शब्द छापले पाहिजेत. यामुळे एका वर्षात एक व्यक्ती वेगळ्या भाषेतील ३०० नवे शब्द शिकू शकते. विचार करा हरियाणामध्ये मल्याळम शिकली जात आहे, कर्नाटकमध्ये बंगाली. इतकं मोठं अतंर पार करण्यासाठी फक्त एक पाऊल उचलण्याचं गरज आहे. आपण ते पाऊल उचलू शकतो का ?” अशी विचारणा यावेळी नरेंद्र मोदींनी केली.