भारत-चीन लष्करामध्ये गलवान व्हॅलीत संघर्ष झाला. या संघर्षावरून दोन्ही देशात तणावाची परिस्थिती आहे. गलवान व्हॅलीत झालेल्या संघर्षानंतर चीन परराष्ट्र मंत्रालयाबरोबरच चिनी पत्रकारांकडून गलवान व्हॅलीवर हक्क सांगितला जात आहे. गलवान व्हॅली हा चीनचा भूभाग असल्याचा दावा एका पत्रकारांन केलं. या पत्रकाराला काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी फैलावर घेत “तुमच्या वरिष्ठांना लेफ्टनंट जनरल सगत सिंह यांनी काय केलं होतं हे तुमच्या वरिष्ठांना विचारा, त्यानंतर गलवान व्हॅलीचं स्पेलिंगही विसरून जाल,” अशा शब्दात उत्तर दिलं.

पूर्व लडाखमधील गलवान व्हॅली सध्या भारत-चीनमधील सीमावादाच्या तणावाचं कारण ठरली आहे. चीननं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या आत येऊन भारतीय भूभागात बांधकाम करण्याचा प्रयत्न केला. त्याला भारतीय सैन्यानं विरोध केला. यातून संघर्ष उफाळल्यानं १५ जून रोजी २० भारतीय जवान शहीद झाले. या घटनेनंतर दोन्ही देशात तणावाचं वातावरण आहे.

गलवान व्हॅलीत उडालेल्या संघर्षावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत माहिती दिली होती. चिनी सैन्यानं घुसखोरी केली नाही, असा दावा पंतप्रधानांनी केला होता. पंतप्रधानांच्या निवेदनानंतर चीनकडून गलवान व्हॅलीवर हक्क सांगण्यात आला. त्याचबरोबर चिनी माध्यमांकडूनही असा दावा केला जात आहे. चीनमधील सीजीटीएन वृत्तवाहिनीच्या शेन शिवेई (Shen Shiwei)या पत्रकारानं गलवान व्हॅलीवर दावा करणार ट्विट केलं. या ट्विटनंतर काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी पत्रकाराला फैलावर घेतलं.

“माझ्यानंतर लेफ्टनंट जनरल सगत सिंह यांचं नाव घ्या. १९६७मध्ये त्यांनी नथूला येथे चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीच्या कमिसारचं काय केलं होतं, हे तुमच्या वरिष्ठांना विचारा. त्यानंतर तुम्ही गलवान व्हॅलीचं स्पेलिंगही विसरून जाल,” अशा शब्दात पवन खेरा यांनी पत्रकार शेन शिवेई (Shen Shiwei) यांना सुनावलं.

काय म्हणाले होते पत्रकार शिवेई?

“गलवान व्हॅली ही चीनचा भूभाग आहे. अनेक वर्षांपासून चिनी सैनिक या भागात गस्त घालतात आणि या भूप्रदेशात कर्तव्यावर आहेत. पूर्ण विराम.”, असं ट्विट पत्रकार शेन शिवेई (Shen Shiwei) यांनी केलं होतं. त्याला पवन खेरा यांनी १९६७ची आठवण देत उत्तर दिलं.