देशाच्या जीडीपीचे आकडे समोर आल्यापासून मोदी सरकार टीकेचे धनी ठरलं आहे. विविध क्षेत्रातील व्यक्तींबरोबरच विरोधी राजकीय पक्षांकडून मोदी सरकारला सवाल विचारत जबाबदार धरलं जात आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यापाठोपाठ वरिष्ठ नेत्यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला आहे. काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी मोदींना त्यांच्या जुन्या विधानांची आठवण करून देत प्रश्न विचारला आहे.

भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीचा दर सरलेल्या एप्रिल ते जून तिमाहीत शून्याखाली घसरून २३.९ टक्क्यांनी आक्रसल्याचे, सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीने स्पष्ट झालं. तिमाहीगणिक आकडेवारी प्रसिद्ध करण्याच्या १९९६ पासून सुरू झालेल्या प्रघातापासून, नकारात्मक आर्थिक विकासाची ही सर्वात भयाण आकडेवारी असून, एकूणच आशियाई देशांच्या अर्थव्यवस्थांमधील सर्वात वाईट कामगिरीही आहे.

घसरलेल्या जीडीपीवरून काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला आहे. “जीडीपी उणे २३.९ टक्के. मोदीजी, तुम्हाला आठवतंय का? ‘अच्छे दिन’, ‘सबका साथ सबका विकास’, ‘तुम्ही काँग्रेसला साठ वर्षे दिली, मला फक्त साठ महिने द्या’, आता पकोडे तळायची वेळ आली आहे. आणि तेही विकले जाणार नाहीत. फक्त भाषण, शून्य शासन,” असं म्हणत सिब्बल यांनी मोदींवर टीका केली आहे.

राहुल गांधींनीही साधला होता निशाणा

आर्थिक संकटाविषयी सर्तक करणारा व्हिडीओ राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर निशाणा साधला होता. “जीडीपी २४ टक्क्यांनी कोसळला आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी घसरण झाली आहे. प्रत्येक इशाऱ्याकडे सरकारकडून दुर्लक्ष केलं जाणं खूप दुर्दैवी आहे,” असं म्हणत राहुल गांधी म्हणाले होते.