मोदी सरकारचा कारभार म्हणजे ‘अंधेर नगरी चौपट राजा’ असा आहे अशी घणाघाती टीका काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे. दिल्लीतल्या रामलीला मैदानावर झालेल्या देश बचाओ रॅलीमध्ये त्यांनी ही टीका केली होती. ‘सबका साथ सबका विकास’ ही घोषणा मोदी सरकारने दिली होती. मात्र आज या मंचावरुन मी विचारते आहे की कुठे आहे सबका साथ सबका विकास? काही ठराविक लोकांचे खिसे भरले जात आहेत. जनतेचा, शेतकऱ्यांचा, बेरोजगारांचा या सरकारला पूर्णपणे विसर पडला आहे अशीही टीका सोनिया गांधी यांनी केली.

“काळा पैसा रोखण्यासाठी नोटबंदीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका रात्रीत घेतला. मात्र आज मी विचारते कुठे आहे तो काळा पैसा? आज देशात बेराजगारी वाढली आहे. लोकांच्या नोकऱ्या जात आहेत. छोटे व्यावसायिक प्रचंड तोटा सहन करत आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत. देशात भीतीचं वातावरण आहे. यालाच म्हणतात का अच्छे दिन? ” असा टोलाही सोनिया गांधी यांनी लगावला.