नक्षलवाद्यांनी छत्तीसगढमध्ये २५ मे रोजी केलेल्या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेले व मृत्यूशी झुंज देत असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री विद्याचरण शुक्ला यांचे मंगळवारी दुपारी गुरगाँव येथील रुग्णालयात निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते.
नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात शुक्ला जायबंदी झाले होते. जगदाळपूर येथील रुग्णालयात त्यांच्या शरीरात घुसलेल्या गोळ्या काढण्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. त्यानंतर रायपूरहून विमानाने त्यांना २६ मे रोजी गुरगाँवला हलविण्यात आले होते. उपचारानंतर पहिल्या आठवडय़ात त्यांची प्रकृती सुधारत होती मात्र नंतर विषाणूसंसर्ग झाल्याने प्रकृती पुन्हा खालावली. वृद्धत्वामुळे त्यांच्या शरीराकडून उपचारांना योग्य तो प्रतिसादही मिळत नव्हता. त्यात अनेक इंद्रिये निकामी झाल्यानंतर मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज अखेर संपली. त्यांच्यामागे पत्नी आणि तीन मुली आहेत. पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शुक्ला यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
काँग्रेसने छत्तीसगढमध्ये काढलेल्या ‘परिवर्तन यात्रे’दरम्यान माओवादी व नक्षलवादी अतिरेक्यांनी भीषण हल्ला चढविला. त्यात ज्येष्ठ नेते महेंद्र कर्मा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल, त्यांचा मुलगा दिनेश यांच्यासह २७ जण मृत्युमुखी पडले. शुक्ला यांच्यासह ३६ जण जखमी झाले होते.
इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीच्या वादग्रस्त कारकिर्दीत शुक्ला हे माहिती आणि प्रसारणमंत्री होते आणि वृत्तपत्रांच्या मुस्कटदाबीत त्यांचा सक्रीय सहभाग होता. नंतर राजीव गांधी यांच्याविरोधात व्ही. पी. सिंग यांनी बंड केले तेव्हा ते त्यांचे समर्थक बनले. व्ही. पी. सिंग मंत्रिमंडळातही ते होते आणि त्यानंतर मंत्रीपद टिकविण्यासाठी चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखालील औट घटकेच्या सरकारमध्येही ते सहभागी झाले. काँग्रेसची सूत्रे पी. व्ही. नरसिंह राव यांच्याकडे आल्यावर ते स्वगृही परतले.
तीन दिवसांचा दुखवटा
शुक्ला यांच्या निधनानिमित्त मुख्यमंत्री रमण सिंह यांनी छत्तीसगढमध्ये तीन दिवसांचा सरकारी दुखवटा जाहीर केला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 12, 2013 1:28 am