गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याबद्दल केरळचे कामगारमंत्री आणि आरएसपीचे (बी) नेते शिबू जॉन हे अडचणीत आले आहेत. काँग्रेसचे नेते आणि यूडीएफमधील घटक पक्षांनी जॉन यांच्या कृतीला तीव्र हरकत घेतली आहे. भाजपच्या नेत्याचे विकासाचे मॉडेल केरळच्या पचनी पडणार नाही, असा दावा घटक पक्षांनी केला आहे.
मोदी भेटीमुळे निर्माण झालेले वादळ शांत करण्यासाठी मुख्यमंत्री ओम्मन चंडी यांनी जॉन यांच्याकडून स्पष्टीकरण मागविले आहे. तथापि, आपण मोदी यांच्याशी केवळ कौशल्यपूर्ण विकास आणि प्रशिक्षण याबाबतच चर्चा केल्याचे जॉन यांचे म्हणणे आहे.
जॉन यांच्याकडून आपण स्पष्टीकरण मागितले आहे. मात्र गुजरातमधील विकासाचे मॉडेल केरळच्या पचनी पडणार नसल्याचे आपण स्पष्ट केले आहे, असे चंडी यांनी सांगितले.
दरम्यान, जॉन यांनी मोदी यांची भेट घेतली आणि ही गोष्ट चंडी यांना माहितीच नव्हती हे मान्य करण्यास माकपचे नेते व्ही. एस. अच्युतानंदन यांनी नकार दिला आहे. पुढील आठवडय़ात श्रीनारायण मठात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्याला मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे त्या कार्यक्रमाला अच्युतानंदन हजर राहणार नाहीत, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
मोदी यांची कोणत्याही राजकीय उद्देशाने आपण भेट घेतली नाही, असे सांगून जॉन यांनी प्रथम या वादावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर आपण मोदी यांची भेट घ्यावयास नको होती, असे जॉन म्हणाले.
भाजप मोदी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्याचा विचार करीत असल्यानेच काँग्रेस आणि यूडीएफला आपण मोदी यांची भेट घेणे खटकले असावे, असेही जॉन म्हणाले.