राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटोनी आणि अहमद पटेल हे हायकमांड सोनिया गांधी यांच्या १० जनपथ या निवासस्थानी दाखल झाले आहेत. राज्यातील महत्वाच्या नेत्यांनाही सोनिया गांधींनी दिल्लीला बोलावून घेतले आहे. या सर्वांमध्ये राज्यात शिवसेनेला सत्तास्थानेसाठी पाठींबा द्यायचा की नाही याबाबत चर्चा होणार आहे.

राज्यातील सत्तास्थापनेच्या तिढ्यावर मार्ग काढण्यासाठी मुंबईपासून दिल्लीपर्यंत जोरात चर्चा सुरू आहेत. काँग्रेस कार्यकारी समितीची सकाळी बैठक झाली. त्या बैठकीत राज्यातील काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांशी बोलून निर्णय घेण्याची भूमिका घेण्यात आली. आता चार वाजता काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांसोबत सोनिया गांधी चर्चा करणार आहेत. सुशीलकुमार शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, वडेट्टीवार यांच्यासह सहा नेत्यांशी सोनिया गांधी चर्चा करणार आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला पाठींबा देण्यास अनुकूल आहेत. मात्र, निवडणूक पूर्व आघाडी केल्याने शिवसेनेला पाठींबा जाहीर करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णयाची वाट पाहत आहे. काँग्रेसने आपला निर्णय जाहीर केल्यानंतर एकत्रितपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपला निर्णय जाहीर करणार आहेत.