माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा गांधी घराण्याव्यतिरिक्त अन्य व्यक्तीकडे सोपविली जाऊ शकते, असे विधान रविवारी केले खरे, मात्र त्यावर काँग्रेस नेत्यांनी जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी पक्षनेतृत्वाला प्रसारमाध्यमांद्वारे सल्ले देण्यापेक्षा व्यक्तिगत स्वरूपातील भेटींद्वारे असे मार्गदर्शन करावे, असे काँग्रेस कार्यकारिणीचे विशेष निमंत्रक अनिल शास्त्री यांनी ‘ट्विप्पणी’द्वारे म्हटले आहे.
काँग्रेस पक्षाचा कारभार भारताच्या राज्यघटनेने आखून दिलेल्या चौकटीनुसार चालतो. अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य पक्षाध्यक्षपदी कोणाची निवड करायची हे ठरविण्यासाठी पात्र आहेत. सोनिया आणि राहुल हे अनुक्रमे पक्षाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आहेत आणि तेच कायम राहतील, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ काँग्रेस नेते रशीद अल्वी यांनी दिली. पक्ष कार्यकर्त्यांशी तसेच नेत्यांशी सोनिया गांधी यांच्या नियमित भेटी होत असतात, असेही त्यांनी स्पष्ट केले, मात्र पक्षाच्या प्रवक्त्यांनी चिदम्बरम यांच्या वक्तव्याविषयी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
चिदम्बरम-वासन जुंपली?
काँग्रेस पक्षाचे नेतृत्व गांधी आडनाव नसलेली व्यक्तीही करू शकते, असे वक्तव्य करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदम्बरम यांना काँग्रेसचेच ज्येष्ठ नेते जी. के. वासन यांनी घरचा अहेर दिला आहे. गांधी आडनावाऐवजी अन्य कोणी पक्षाचे नेतृत्व करावे, अशी कार्यकर्त्यांची मानसिकता नसल्याचे स्पष्ट करून, वासन यांनी सोनिया आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वावरच शिक्कमोर्तब केले आहे.
गांधी आडनाव नसलेली व्यक्ती काँग्रेसचे नेतृत्व करू शकते का, असा प्रश्न चिदम्बरम यांना एका दूरचित्रवाणी वाहिनीने एका मुलाखतीच्या वेळी विचारला. तेव्हा त्यांनी होकारार्थी उत्तर दिले. मात्र तसे कधी होईल, ते सांगण्यास चिदम्बरम यांनी असमर्थता दर्शविली होती.तथापि, गांधी आडनाव नसलेल्या व्यक्तीने पक्षाचे नेतृत्व करावे, अशी काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंतच्या कोणत्याही काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही, असे वासन यांनी स्पष्ट केले. अशी कोणतीही कल्पना पुढे आलेली नाही, असे आपले मत आहे, असेही ते म्हणाले. त्यामुळे तामिळनाडू काँग्रेस समितीमध्ये असलेले मतभेद चव्हाटय़ावर आले आहेत.काँग्रेस पक्षात संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच चिदम्बरम यांनी वक्तव्य करणे आणि वासन यांनी त्याला प्रत्युत्तर देणे तामिळनाडू काँग्रेसमध्ये महत्त्वाचे मानले जात आहे.