सुधारित नागरिकत्व कायद्या(CAA) वरून देशभरात सुरू असलेल्या विरोधीपक्षांच्या आंदोलनांच्या पार्श्वभूमावर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी व सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. या तिघांनी या कायद्यावरून जनतेची दिशाभूल करून, दंगली घडवल्या असल्याचा शाह यांनी आरोप केला आहे.

सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल भाजपाकडून जनजागृती करण्याचे अभियान राबवले जात आहे. दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये आयोजित मेळाव्यास संबोधित करत असताना गृहमंत्री शाह यांनी हा आरोप केला.

१९८४ मध्ये शीखविरोधी दंगल झाली. यात अनेत शीख बांधवांची हत्या झाली. मात्र काँग्रेस सरकारकडून या दंगलीतील पीडितांना दिलासा दिला गेला नाही. तर पंतप्रधान मोदी सरकारने प्रत्येक पीडित व्यक्तीला पाच लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून दिले. एवढेच नाहीतर जे दोषी होते, त्यांना तुरुंगात देखील पाठवले असल्याचे शाह यावेळी म्हणाले.

दिल्लीतील सीमापुरी भागात सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधादरम्यान हिंसाचार उफाळला होता. दरम्यान, याबाबत एसआयटीनं मोठा खुलासा केला आहे. दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारात १५ बांगलादेशी नागरिकांचा सहभाग होता, असं एसआयटीकडून सांगण्यात आलं आहे. हे बांगलादेशी नागरिक अवैधरित्या सीमापुरी परिसरात राहत होते. त्यांची ओळख आता पटवण्यात आली असून त्यांच्या अटकेसाठी छापे टाकण्यास सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.